राज्य मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल ? नाना पटोलेंच्या वक्तव्याने खळबळ

भंडारा : राज्यात महाविकास आघाडी सरकारला आता दोन वर्षे पुर्ण होत आहेत. भाजपकडून अनेकदा महाविकास आघाडी पडणार, अशा पद्धतीचं वक्तव्य केले जात होते. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी पुर्ण पाच वर्षे सत्तेत राहिल, असं चित्र सध्या राज्यभरात आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात काही बदल केले जातील, असं वक्तव्य कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यांची चर्चा सध्या राज्यभर सुरू झाली आहे.

भंडारा येथील एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करताना नाना पटोले यांनी वक्तव्य केले आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यांमध्ये काही बदल केले जातील, असं सुचक वक्तव्य त्यांनी केले आहे. तसेच यासंदर्भात कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांच्याशी देखील चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे राज्यात खरचं बदल होतील का ? याकडे सगळ्याचं लक्ष लागून आहे.

नाना पटोले म्हणाले की, सरकारमध्ये जे काही सध्या चालले आहे. त्याच्यात बदल करण्याची वेळ आपल्याकडे आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पाडू द्या. त्यानंतर १० मार्चनंतर राज्याच्या मंत्रिमंडळात मोठे बदल आपल्याला बघायला मिळतील. त्याचबरोबर जनता दरबाराच्या माध्यमातून पुन्हा एकदा कॉंग्रेसचे काम केले जाणार असल्याचं ही नाना पटोले म्हणाले.

महाविकास आघाडीच्या सरकार मध्ये सर्वात जास्त मंत्री १४ मंत्री हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. त्याखालोखाल मुख्यमंत्री पद असलेल्या शिवसेना पक्षाचे १२ मंत्री सध्याच्या सरकारमध्ये आहेत. तर कॉंग्रेसचे सर्वात कमी म्हणजे १० आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यामध्ये बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर, नितीन राऊत, के.सी पाडवी, सुनील केदार, अमित देशमुख, सतेज पाटील, विश्वजीत कदम, अस्लम शेख यांनी ठाकरे सरकार मध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर नाना पटोले यांची विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती.