‘माझी समोरूनची लढाई असते, मी मागून लढत नाही आणि पवारांचा इतिहास सर्वज्ञात आहे’

उदयपुर  – महाविकास आघाडीत (MVA) सत्तेचा उपभोग घेणारे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी हे एकमेकांवर चिखलफेक करत असल्याचे दिसून येत आहे. यातच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी राष्ट्रवादी, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर (Sharad Pawar and Ajit Pawar) यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

राष्ट्रवादीचा भाजपसोबत मिळून काँग्रेसला (Congress) संपवण्याचा प्रयत्न आहे.  तर पवार कुटुंबाचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. राष्ट्रवादीचं भाजपशी(BJP) साटंलोटं असून काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न आहे, अशा शब्दात नाना पटोलेंनी हल्लाबोल केला आहे.  उदयपूरमध्ये (Udaipur) काँग्रेसचं नवसंकल्प शिबिर सुरु आहे. याठिकाणी एबीपी माझाशी बोलताना पटोले यांनी हे गंभीर आरोप केले आहेत.

नाना पटोलेंनी म्हटलं की, पहाटेच्या शपथविधीनंतर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सोनिया गांधींनी (Soniya Gandhi) महाविकास आघाडीचा निर्णय घेतला, तो आम्ही पाळला आहे. मात्र राष्ट्रवादी भाजपला वाढविण्यासाठी त्यांच्याशी साठंगाठं करीत काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांचा आम्ही विरोध करतो असा टोला नाना पटोंलेंनी पवारांना लगावला आहे.  माझा इतिहास अजित पवारांनी काढला असेल, मात्र माझी समोरूनची लढाई असते, मी मागून लढत नाही आणि पवारांचा इतिहास सर्वज्ञात आहे. त्यामुळे मला त्यात पडायचे नाही असे म्हणत येणाऱ्या निवडणुकात योग्य निर्णय हायकंमाड (High Command) करेल असंही त्यांनी म्हटलं.