Deepak Kesarkar | महाराष्ट्रातील आजच्या राजकीय परिस्थितीला शरद पवार जबाबदार, मंत्री दिपक केसरकर यांचा आरोप

Deepak Kesarkar |  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार हे सध्याच्या राजकीय परिस्थितीला कारणीभूत आहेत, असा आरोप शिवसेना नेते मंत्री दिपक केसरकर यांनी केला. भाजप, अजित पवार यांना व्हिलन करायचे आणि आपणच शिवसेनेचे तारणहार आहोत, असे चुकीचे चित्र शरद पवारांविषयी तयार होत आहे जे चूक आहे, असे केसरकर यांनी सांगितले. आज पार पडलेल्या महायुतीच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सामान्य शिवसैनिक जो बाळासाहेबांनी घडवला त्याच्यापर्यंत योग्य भूमिका पोहचणे आवश्यक आहे. बाळासाहेबांचा विचार कायम ठेवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात इतिहास घडवला. मात्र शरद पवारांनी वेळोवेळी भूमिका बदलून राजकारण केले. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी एकमेकांविरोधात बोलायचे नाही, असे १९८९ मध्ये ठरवले होते. बाळासाहेबांनी आयुष्याच्या शेवटपर्यंत हा शब्द पाळला. परंतु शिवसेनेच्या बाबत वेगळेच घडले. शिवसेनेत तीन चार वेळा फूट पडली, त्यामध्ये शरद पवार यांची प्रमुख भूमिका होती, असा आरोप केसरकरांनी (Deepak Kesarkar ) केला.

राज्यात २०१९ मधील निवडणुकीनंतर शरद पवारांनी न मागता भाजपला पाठिंबा दिला होता. यामुळे शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी केली. त्या दिवसापासून शिवसेनेला संपवण्याची सुरुवात झाली, असे केसरकर यांनी सांगितले. २०१७ मध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात अनेक बैठका झाल्या. यात कोण मंत्री असावे इतके सूक्ष्म नियोजन झाले होते. याचा प्रस्ताव जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवला तेव्हा मोदींनी सांगितले की, राष्ट्रवादीला सोबत घेण्यास हरकत नाही पण शिवसेना कुठल्याही परिस्थितीत सत्तेत असली पाहिजे. मोदींनी नेहमीच शिवसेनेला सोबत ठेवले मात्र उद्धव ठाकरेंकडून आज मोदींना विरोध केला जात आहे, असे त्यांनी सांगितले.

याउलट शरद पवारांनी शिवसेना जर सत्तेत असेल तर आम्ही भाजपसोबत येणार नाही, अशी उघड भूमिका घेतली होती. पवारांना आज शिवसैनिकांची मदत हवीय पण त्यांच्या मनात शिवसेना संपवायची हा विचार आहे, असा आरोप केसरकरांनी केला. महाविकास आघाडी सरकारवेळी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करताना शरद पवार यांनी घेतलेली भूमिका अयोग्य होती. एकनाथ शिंदे यांच्या हाताखाली ज्येष्ठ नेते काम करणार नाहीत, अशी पवारांनी भूमिका घेतली होती, मात्र आजच्या घडीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबरीने राज्यात अनेक वरिष्ठ नेते काम करत आहेत, असे त्यांनी सांगितले.

कुटुंबांत फूट पाडण्याचा आरोप शरद पवार करतात, मात्र ही गोष्ट अनेकवेळा त्यांच्यामुळेच घडली आहे, असे केसकरांनी सांगितले. शिवसेना ही गोरगरिबांसाठी धावून जाणारी संघटना आहे. त्यामुळे राज्यात शिवसेना टिकली पाहिजे.ज्या दिवशी काँग्रेससोबत जाण्याची वेळ येईल, तेव्हा मी राजकारण सोडेन इतके सुस्पष्ट विचार बाळासाहेब ठाकरे यांचे होते.

अजित दादांना कुठेतरी व्हिलन करायचे आणि स्वत: हिरो बनायचे ही भूमिका योग्य नाही. गेल्या १५ ते २० वर्षात राज्यात अनेक तरुण नेते तयार झालेत. ज्यात देवेंद्र फडणवीस, अजित पवार तयार झाले. या तरुण नेत्यांची फळी कापून काढायची असा शरद पवारांचा विचार आहे. शरद पवार राज्यातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी चांगल्या कामाला आशिर्वाद देणे अपेक्षित आहेत. त्यांनी अशा प्रकारचे राजकारण करणे जे महाराष्ट्राच्या हिताचे नाही, असे केसरकर म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Supriya Sule | माझी लढाई अदृश्य शक्तीच्या विरोधात

Devendra Fadnavis | ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची आहे, विचार करुन मत द्या

Sharad Pawar | गेल्या दहा वर्षांत सर्वसामान्य जनतेला केवळ फसवण्याचं काम झाले