सुधीर तांबेंनी पक्षाला फसवलं, सत्यजीतला अजिबात पाठिंबा देणार नाही –  नाना पटोले 

नागपूर – कॉंग्रेसच्या प्रदेश कार्यकारणीतील युवा नेता सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी नाशिकच्या पदवीधर निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावरून राज्याच्या राजकारणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या राजकीय खेळीची चर्चा होऊ लागली आहे. सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरणे, वडील सुधीर तांबे यांना एबी फॉर्म आलेला असतांना निवडणुकीतून माघार घेणे, आणि भाजपनेही उमेदवार न देणे ही फडणवीस यांची राजकीय खेळी असल्याचे बोललं जात आहे.

सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांनी पक्षाला फसवलं आहे. त्यामुळं नाशिक पदवीधर मतदारसंघात (Nashik Graduate Constituency)  काँग्रेस सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देणार नसल्याची स्पष्ट भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी घेतली आहे. काल झालेल्या घडामोडींचा अहवाल हायकमांडला दिला आहे. याबाबतचा पुढील निर्णय हायकमांड घेईल. मात्र, काँग्रेस बंडखोर उमेदवाराला पाठिंबा देणार नसल्याचे नाना पटोले म्हणाले.

भाजप भय दाखवून घरं फोडण्याचं काम करत असल्याची टीका पटोले यांनी केली. भाजप आज दुसऱ्याची घरं फोडून आनंद घेत आहे. पण ज्यादिवशी भाजपचे घर फुटेल त्यादिवशी त्यांना घरं फोडण्याचे दु:ख काय असते ते कळेल असे पटोले म्हणाले.

दरम्यान, दुसऱ्या बाजूला सत्यजीत तांबे यांनी पाठिंबा मागितल्यास आम्ही देऊ, अशी भूमिका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी घेतल्यामुळे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक रंजक बनली आहे. तसेच काँग्रेसने एबी फॉर्म देऊनही आणि ते डॉ.सुधीर तांबे वर्तमान आमदार असूनही त्यांनी एबी फॉर्म का भरला नाही? याचे उत्तर तेच देऊ शकतात, असेही बावनकुळे यावेळी म्हणाले.