नाना तू येऊनच दाखव, परत कसा जातो तेच पाहतो; नाना पटोलेंना लाडांचा थेट इशारा

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संसदेतील वक्तव्यावरून कॉंग्रेस आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवास स्थानाबाहेर आंदोलन करणार आहे. त्यामुळे आंदोलन करण्यापूर्वी भाजपने कॉंग्रेसला आव्हान दिले आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर भाजपचे आणि कॉंग्रेसच्या कार्यकर्ते आमनेसामने आले तर मोठा राडा होण्याची शक्यता आहे.

यावरून भाजपचे नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना थेट इशारा दिला आहे. ‘नाना पटोले मी तुम्हाला आव्हान देतो की, तू येऊनच दाखव. नाही तुला उलटा प्रसाद दिला तर मी पण भाजपवासी नाही. सागरवर ये. पाहतो तु कसा जातो, असा इशारा प्रसाद लाड यांनी दिला आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चिघळण्याची शक्यता आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यात राजकीय वाकयुद्ध सुरू आहे. नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना कॉंग्रेसवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर महाराष्ट्रात नाना पटोले यांनी महाराष्ट्राच्या जनतेची मोदींनी माफी मागावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यानंतर भाजप नेत्यांच्या घराबाहेर कॉंग्रेसने आंदोलन करण्यास सुरू केले. संपूर्ण महाराष्ट्रात कॉंग्रेसचे हे आंदोलन सध्या सुरू आहे. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोरही कॉंग्रेसने मोठा राडा घातला होता.

काही दिवसांपूर्वी भाजप- शिवसेना यांच्यात राजकीय युद्ध सुरू झालं होतं. मात्र सध्या परिस्थिती भाजप विरूद्ध कॉंग्रेसमध्ये जोरदार राजकीय लढाई सुरू झाली आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण सध्या ढवळून निघाले आहे. कॉंग्रेसने देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला असल्याने आज त्याठिकाणी मोठा गोंधळ उडण्याची शक्यता आहे.