उत्तराखंड, गोव्यात आज उमेदवारांचे भवितव्य ठरणार! विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीसाठी पाच राज्यांपैकी उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि गोव्यातील 165 जागांसाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेशात दुसऱ्या टप्प्यात 55 जागांवर मतदान होत आहे. तर दुसरीकडे, उत्तराखंडमधील सर्व 70 जागांवर आज मतदान होत आहे. गोव्यातील 40 जागांसाठीच्या उमेदवारांचे भवितव्यही आज मतपेटीत बंद होणार आहे. गोव्यात यावेळी भाजप आणि काँग्रेसशिवाय टीएमसी आणि आम आदमी पार्टीही रिंगणात आहेत.

गोव्यातील विधानसभेच्या एकूण 40 जागांसाठी 301 उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीच्या रिंगणात मुसंडी मारणार्‍या देशातल्या मोठ्या पक्षांच्या मतांवर छोटे पक्ष कमी पडू शकतात, असे तज्ञांचे म्हणणे आहे. तर भाजप आणि काँग्रेस व्यतिरिक्त आम आदमी पार्टी, गोवा फॉरवर्ड पार्टी, तृणमूल काँग्रेस, महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, क्रांतिकारी गोवा पार्टी, गोएंचो स्वाभिमान पार्टी, जय महाभारत पार्टी आणि संभाजी ब्रिगेडही यावेळी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. याशिवाय यावेळी 68 अपक्ष उमेदवारही आपले नशीब आजमावत आहेत.

उत्तराखंडमधील 70 जागांवर मतदान सोमवारी मतदान होत आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार आहे. गेल्या वेळी राज्यात एकूण 65.56 टक्के मतदान झाले होते, यावेळी कोविडमुळे मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे आव्हान निवडणूक आयोगासमोर असेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ते प्रादेशिक पक्षांतील प्रमुख नेत्यांनी यावेळी प्रचाराचा धुरळा उडवला. त्यामुळे यावेळी पाचही राज्यात सत्ताधारी पक्षांना सत्ता टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान असणार आहे. तर गोव्यात देखील यावेळी मोठी चुरस बघायला मिळणार आहे.