राज्यात शिवशक्ती कुठे आहे? प्रकाश आंबेडकर यांनी किती घरं बसवली? राणेंचा हल्लाबोल

मुंबई: राज्याच्या राजकीय पटलावर शिवशक्ती आणि भीमशक्ती पुन्हा एकदा एकत्र आली आहे असून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीत युती झाली आहे. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली. वंचित आघाडी आणि ठाकरे गट आगामी निवडणुका एकत्रितपणे लढणार आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटासाठी मोठं आव्हान उभं राहणार आहे असं सांगितले जात आहे.

दरम्यान, आता या मुद्द्यावरून भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी टीकास्त्र सोडले आहे. नारायण राणे म्हणाले, मुळात उद्धव ठाकरे आणि प्रकाश आबंडेकर याचं अस्तित्वच काय आहे? राज्यात आता शिवशक्ती कुठं राहिली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे १२ देखील आमदार राहिले नाहीत.

मोदींवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना ते म्हणाले, मोदींवर टिका करण्याची या दोघांची लायकी नाही.. राज्यात शिवशक्ती तर नाहीच. भीमशक्ति देशात आहे पण प्रकाश आंबेडकरकडे किती आहे? त्यानं किती दलितांची घरं बसवली ? मी सांगतो मी किती जणांची घरं बसवली… असं वक्तव्य नारायण राणे यांनी केलं. शिवसेना आणि वंचित आघाडी एकत्र आल्याने राज्याच्या राजकारणात काहीही फरक पडणार नाही, अशी स्पष्टोक्ती नारायण राणे यांनी केली.टीव्ही नाईन मराठीने याबाबत वृत्त दिले आहे.