नरेंद्र मोदी स्वतःला ओबीसी म्हणवून घेतात मग ओबीसींच्या हक्कासाठी इम्पिरिकल डेटा का देत नाहीत?

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेलने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय ओबीसी अधिवेशनात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणात ओबीसींच्या आरक्षणाचा संपूर्ण इतिहास मांडून विरोधकांच्या आरोपांची चांगलीच चिरफाड केली. महात्मा फुले ते राजर्षी शाहू महाराज, कालेलकर आयोग ते मंडल आयोग आणि २०११ सालची जातिनिहाय जनगणना ते २०१७ साली फडणवीस मुख्यमंत्री असताना सुप्रीम कोर्टात भाजपच्या लोकांनी ट्रिपल टेस्टसाठी धरलेला आग्रह या सर्व महत्त्वाच्या घटनांचा मागोवा आणि त्याचे मुद्देसूद विश्लेषण छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणात केले.

भाषणाच्या सुरुवातीलाच छगन भुजबळ यांनी राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांची आरोग्य तपासणी केली पाहिजे. त्यांच्या शरीरातले सोडीयम वगैरे कमी झाल्यामुळे बहुतेक स्मरणशक्ती कमजोर झाली असेल अशी जोरदार टीका केली. शिवाय ओबीसी आरक्षणासाठीचा इतिहास काय आहे? त्यासाठी कुणी लढा दिला? याची जाणीव विरोधकांनी ठेवायला हवी. इतिहास विसरता कामा नये. इतिहास जाणून घेतला तरच सर्वांना एकत्र येऊन काम करता येईल. राज्यात आरक्षणासाठी आक्रोश न करता तोच आक्रोश भाजपच्या लोकांनी दिल्लीत जाऊन केला तर आरक्षण मिळणे सोपे जाईल असा जोरदार टोलाही छगन भुजबळ यांनी लगावला.

आरक्षणाचा इतिहास सांगत असताना छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाची लढाई ही आजची असली तरी त्याच्या मुळाशी पाच हजार वर्षांपासूनचा मनुवाद आणि त्यासोबतचा संघर्ष दडला आहे. महात्मा जोतीराव फुले यांनी पहिल्यांदा मनुवादाच्या विरोधात संघर्ष सुरु केला. राजर्षी शाहू महाराजांनी देखील वेदोक्त प्रकरणानंतर आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडली. फुलेंनी त्यांच्याकाळात “कामे वाटून द्या, प्रत्येक जातीला” अशी मागणी ब्रिटिशांकडे केली. तीच भूमिका शाहू महाराजांनी घेऊन आरक्षण देऊ केले, त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कळस चढवत संविधानाच्या आधारे आरक्षण दिले हेही स्पष्ट केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्रिपदाचा राजीनामा का दिला? याची माहितीही लोकांना आपण दिली पाहिजे. ओबीसींसाठी आयोग गठीत करा, अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र हा आयोग गठीत केला नाही म्हणून त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. पण आपण काल-आजच्या घटनांवरच चर्चा करतोय. हा इतिहास देखील लोकांना सांगितला गेला पाहिजे, असे आवाहनही छगन भुजबळ यांनी केले. भाजपचे लोक आरक्षण मिळाले नाही म्हणून बोंब ठोकतात आणि दुसऱ्या बाजूला हेच लोक कोर्टात जाऊन आरक्षणाला विरोध करतात. मी ब्राह्मणांच्या विरोधात नाही, पण मी मनुवादाच्या विरोधात आहे, अशी रोखठोक भूमिकाही छगन भुजबळ यांनी मांडली.