‘राष्ट्रवादी पक्ष ‘प्रायव्हेट कॅरियर पार्टी’…; शिवसेना मंत्र्याने घेतले थेट राष्ट्रवादीला शिंगावर

औरंगाबाद – महाविकास आघाडीतील धुसफूस पुन्हा एकदा समोर आली आहे. कारण औरंगाबादेत काल झालेल्या राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या मेळाव्यात खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या समक्ष टोपे यांनी शिवसेनेचे (Shivsena) मंत्री संदीपान भुमरे आणि सत्तार यांचे नाव घेत हे दोघेही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना धमकावत आहेत, फोडाफोडी करत आहेत, असा आरोप केला आहे.

सोमवारी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि राजेश टोपे (Rajesh Tope) औरंगाबादच्या दौऱ्यावर होते. यावेळी राष्ट्रवादीच्या शहर आणि ग्रामीण पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांकडून वाईट वागणूक मिळत असल्याचा आरोप केला. तर शिवसेनेचे मंत्री संदिपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांना फोडण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं टोपे म्हणाले होते.

दरम्यान,  माझ्या सिल्लोड-सोयगांव मतदारसंघात राष्ट्रवादी काॅंग्रेस हा पक्ष फक्त नावाला आहे. या पक्षाची तिथे ताकदच नाही, मग फोडाफोडी कशाला करू, अशा शब्दात शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांना प्रत्युत्तर दिले आहे. राजकारणात त्यांच्याकडे एकही ‘पब्लिक कॅरियर’ नसून राष्ट्रवादी पक्ष आता प्रायव्हेट कॅरियर पार्टी’ झाली असल्याची खोचक टीका सत्तार यांनी यावेळी केली.