नवाब मलिकांनी हसीना पारकरला 55 लाख रोख दिले, ईडीची आरोपपत्रात माहिती

मुंबई : मनी लाँड्रिंगच्या (money laundering case) आरोपांचा सामना करत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अंमलबजावणी संचालनालयाने आपल्या आरोपपत्रात   नवाब मलिकांविरोधात अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत.

ईडीच्या आरोपपत्रानुसार नवाब मलिक 15.99 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी (ED charge sheet Nawab Malik) आहेत. ईडीच्या म्हणण्यानुसार मुंबईतील गोवावाला कंपाऊंडच्या भाडेकरूंकडून 14 वर्षात 11 कोटी रुपये भाडे म्हणून घेतले होते. यापैकी मलिकने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकर हिला 55 लाख रुपये रोख दिले.असल्याचं देखील सांगण्यात येत आहे.

नवाब मलिक यांच्यावर दाखल करण्यात आलेला खटला 15.99 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंगशी संबंधित आहे. यामध्ये कुर्ल्यातील गोवावाला कंपाऊंडच्या भाडेकरूंकडून 2008-09 पासून वसूल केलेल्या 11.7 कोटी रुपयांचाही समावेश आहे. ईडी याला गुन्ह्याची प्रक्रिया मानत आहे. मलिक आणि इतर तिघांविरुद्ध दाखल केलेल्या आरोप पत्रानुसार 2003 मध्ये मलिक यांनी त्यांची दिशाभूल करून सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्स कंपनी ( Solidus Investments Company ) विकत घेतली होती. ही कंपनी गोव्यातील कंपाऊंडमधील भाडेकरूची होती.