राष्ट्रवादी काँग्रेसकडून रुपाली पाटील ठोंबरे यांना मोठी जबाबदारी, ‘या’ पदावर नियुक्ती

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेता रूपाली पाटील ठोंबरे (NCP leader Rupali Patil Thombre) यांची पुणे शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. रूपाली पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी मनसेतून (MNS) राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर रुपाली पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला प्रदेशाध्यक्ष पद मिळेल अशी चर्चा होती मात्र अखेर त्यांना शहर उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांची क्षमता पाहता त्यांना आणखी मोठे पद मिळायला हवे होते असं काही जाणकार लोकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, रुपाली पाटील यांना पक्षाकडून देण्यात आलेल्या पत्रातून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. या पत्रात असे म्हटलं आहे की, आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (sharad Pawar) यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (मंत्री, जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार आपल्या पक्षाची विचारधारा व तत्वांना केंद्रस्थानी ठेवून पक्षाच्या विस्ताराथ आणि संघटन वाढवण्यासाठी आपण यशस्वी वाटचाल कराल व आपल्या सक्षम कृतीतून जनसामान्यांच्या मनात आपल्या पक्षाची प्रतिमा उत्तरोत्तर अधिक उज्ज्वल कराल, असा विश्वास आहे. आपल्या निवडीबद्दल अभिनंदन आणि भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा रुपाली पाटील यांना देण्यात आल्या आहेत.

मनसेमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर रूपाली पाटील या नेहमीच चर्चेत राहिल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनातील एक आक्रमक चेहरा म्हणून रूपाली पाटील यांच्याकडे पाहिले जाते. पुणे महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली असून, त्यानंतर लगेचच रूपाली पाटील यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी देऊन निवडणुकीची तयारी सुरु केल्याचे बोलले जात आहे.