राज्यातल्या 14 महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकांसाठी प्रभाग आरक्षणाची सोडत जाहीर

मुंबई – राज्यातल्या 14 महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकांसाठी न्यायालयाच्या आदेशानुसार प्रभाग आरक्षणाची सोडत काल काढण्यात आली. प्रभागनिहाय आरक्षणाचं प्रारूप आज प्रसिद्ध होणार असून त्यावर येत्या 6 जूनपर्यंत हरकती आणि सूचना नोंदवता येतील. 13 जून रोजी अंतिम यादी जाहीर होईल.

मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी 236 प्रभागांची सोडत काढण्यात आली. यात अनुसूचित जातीच्या 15 जागांपैकी 8 जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. अनुसूचित जमातीसाठी 2 जागांपैकी 1 जागा महिलांसाठी आरक्षित झाली आहे. तसंच सर्वसाधारण प्रवर्गाच्या 219 जागांपैकी 109 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत.

पुणे महापलिकेत एकंदर 173 जागांपैकी 74 जागा सर्वसाधारण महिलांसाठी, 12 जागा अनुसूचित प्रवर्गातील महिलांसाठी तर 1 जागा अनूसूचित जमाती प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. तर पुरूषांसाठी सर्वच प्रभागांमध्ये 1 जागा जाहीर झाली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 139 जागांपैकी अनुसूचित प्रवर्गासाठी 22 जागा आरक्षित असून त्यापैकी 11 महिलांसाठी, अनुसूचित जमातीसाठी 3 जागा असून यापैकी 2 महिला, तर खुल्या गटात 114 जागांपैकी 57 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

नवी मुंबई महानगरपालिकेत महिलांच्या अनुसूचित जातीकरता 6, अनुसूचित जमातीकरता 1, सर्वसाधारण महिलातंर्गत 14 जागा राखीव झाल्या आहेत. अमरावती महानगरपालिकेत 39 जागा खुल्या प्रवर्गातल्या महिलांसाठी राखीव झाल्या. अनुसूचित जातीसाठीच्या 17 राखीव जागांपैकी 9 अनुसूचित जातीच्या महिलांसाठी, अनुसूचित जमातीच्या 2 जागांपैकी 1 जागा महिला उमेदवारासाठी राखीव झाली आहे.

नाशिक महापालिकेत 67 महिलांना आरक्षणात स्थान मिळालं असून अनुसूचीत जातीच्या 19 जागांपैकी दहा महिलांसाठी तर अनुसूचीत जमातीच्या 10 पैकी 5 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. नागपूर महानगरपालिकेत 78 जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. अनुसूचित जातींच्या 31 जागांपैकी 16 जागा प्रवर्गातल्या महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जमातीकरता 12 जागा राखीव असून त्यापैकी 6 जागा प्रवर्गातल्या महिलांकरता राखीव आहेत.