चमकोगिरी करण्याच्या नादात रूपालीताईंनी केला गोपनीयतेचा भंग; निवडणूक आयोग कारवाई करणार का?

Pune – कसबा पेठ (Kasba Peth) आणि पिंपरी–चिंचवड विधानसभा (Chinchwad) जागांच्या पोट-निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील (Rupali Patil Thombre) यांनी स्वतःचा मतदानाचा हक्क बजावताना ईव्हीएम मशीनचा (EVM Machine) फोटो काढून गोपनीयतेचा भंग केला आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग या प्रकरणाची गंभीर दखल घेणार का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

मतदान प्रक्रिया पार पडत असताना अनेक नियमांचं पालन केलं जातं. मतदान करायला जाताना मतदान केंद्रावर मोबाईल, कॅमेरा वापरावर निर्बंध असतात. कोणत्याच मतदाराला येथे मोबाईल घेऊन जाता येत नाही. यासाठी मतदान केंद्रावर सुरक्षा व्यवस्था तैनात केलेली असते. मात्र, असे असतानाही राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी मतदान करतानाचा फोटो काढला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. चमकोगिरी करण्याच्या नादात त्यांनी हा फोटो पोस्ट केला का असा देखील सवाल उपस्थित होऊ लागला आहे.