‘आत्मविश्वासाला धक्का लागला की…’, ज्योतिष भेटीवरून शरद पवारांचा एकनाथ शिंदेना चिमटा

शिर्डी (अहमदनगर): मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा शिर्डी दौरा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. शिर्डीत साईबाबांचं (Shirdi Saibaba) दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिन्नर तालुक्यातील इशानेश्वर मंदिरात गेले. तेथे अंकशास्त्राचे अभ्यासक अशोक खरात (Ashok Kharat) यांची त्यांनी भेट घेतली.

त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले भविष्य जाणून घेतले, अशी अफवा उठवण्यात आली आहे. इशानेश्वर मंदिराचे फोटो तर आहेत. पण भविष्य जाणून घेतले की नाही, याबाबत उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. यावर TV9 कडे सिन्नर येथील ज्योतिषी अशोक खरात यांनीच स्पष्टीकरण दिलंय.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे केवळ ईशानेश्वर मंदिरात दर्शनासाठी आले होते. ते भविष्य जाणून घेण्यासाठी आले नव्हते, असा खुलासा अशोक खरात यांनी केलाय.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवर विरोधी पक्ष टीका करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनीही यावरून एकनाथ शिंदेंना  (Sharad Pawar On Eknath Shinde) टोला लगावला आहे. आत्मविश्वासाला धक्का लागलेली व्यक्ती ज्योतिषाकडे जाते, असे शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

याबद्दल पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले की, “मी काही ज्योतिषी नाही. त्यामुळे सरकार कधी कोसळेल हे मी सांगू शकणार नाही. माझा त्यावर विश्वास नाही. मी दौरा सोडून हात दाखवायला कुठे जात नाही. हल्ली आपण नवीन गोष्टी पाहात आहोत, महाराष्ट्रात जे कधी घडलं नव्हतं. ते घडत आहे. ठिक आहे.”

“आसाममध्ये काय घडलं ते सर्व देशांनी पाहिलं. आता पुन्हा आसामची ट्रिप होणार आहे. वर्तमानपत्रातच आम्ही या बातम्या वाचतो. कार्यक्रम बंद करून शिर्डीला जाणं. त्यानंतर दुसरीकडे जाऊन हात दाखवणं या गोष्टी महाराष्ट्राला नवीन आहे. हे राज्य पुरोगामी आहे. विज्ञानाचा पुरस्कार करणारं राज्य म्हणून लौकीक आहे. त्या राज्यात या गोष्टी पाहायला मिळत आहेत. आत्मविश्वासाला धक्का बसतो तेव्हा लोक अशा गोष्टीकडे जातात. ज्योतिषाला हात दाखवतात,” असा चिमटा त्यांनी काढला.