भविष्य पाहण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्योतिषी बाबाकडे धाव?

शिर्डी (अहमदनगर): महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. एकनाथ शिंदे हे त्यांचे भविष्य जाणून घेण्यासाठी मिरगाव येथील एका ज्योतिषी बाबाकडे गेले असल्याची चर्चा आहे. शिर्डी दौऱ्यावर असताना अचानक त्यांनी सिन्नरच्या मिरवागमधील ईशान्येश्वर मंदिराकडे धाव घेतली आणि तेथील एका ज्योतिषी बाबाकडून आपले भविष्य पाहिल्याची चर्चा आहे. यानंतर एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवर विरोधी पक्ष टीका करत आहेत.

मंत्रिमंडळ बैठक रद्द करुन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काल शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेतलं. मुंबईत नियोजित बैठका असूनही त्यांनी सगळ्या बैठका अचानक रद्द केल्या आणि ते हेलिकॉप्टरने शिर्डीला पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे उपस्थित होते.

शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर एकनाथ शिंदेंनी मुंबईला परतणं अपेक्षित होतं. परंतु गुप्तपणे त्यांचा ताफा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील मिरगावच्या ईशान्येश्वर मंदिराकडे वळाला. यामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ झाली. या ईशान्येश्वर मंदिरात एकनाथ शिंदे यांनी एका ज्योतिषाकडून आपले भविष्य जाणून घेतले असल्याचे समजत आहे.

मुख्यमंत्री ज्या बाबाला भेटले ते भविष्यवाणी करत असल्याची माहिती आहे. यानंतर मात्र मुख्यमंत्र्यांनी ज्योतिषीकडून खरंच भविष्य जाणून घेतलं का? आणि भविष्य जाणून घेतलं असेल तर नेमकी काय माहिती विचारली? असे अनेक प्रश्न उभे राहत आहेत.