“अजितदादा महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन आहेत”, सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आज कार्याध्यक्षा म्हणून निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी भवनमध्ये आल्या असता त्यांचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकार्‍यांनी ढोलताशांच्या गजरात आणि फुलांची उधळण करत जंगी स्वागत केले. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना सुप्रिया सुळेंनी अजित पवार (Ajit Pawar) यांना राजकारणातील अमिताभ बच्चन असा उल्लेख केला.

कार्याध्यक्ष पदातील कामाचे विभाजन हे क्लीअरकट झालेले आहे. माझा मतदारसंघ महाराष्ट्रात आहे. अर्थात संघटनेची जबाबदारी माझ्यावर आली आहे. त्यामुळे दिल्लीतील लोकसभा आणि प्रफुल पटेल यांना राज्यसभा असे कामाचे क्लीअरकट विभाजन झाले आहे. त्यामुळे सर्व जबाबदारी माझ्या एकटीवर नाहीय. टीमवर्क म्हणून आम्ही देशात काम करतोय. प्रत्येकाचा रोल वेगवेगळा आहे. घरात लग्न असले की एकटाच धावपळ करत नाही तर प्रत्येकाला जबाबदारी दिलेली असते त्यामुळे पक्ष म्हणून, एक कुटुंब म्हणून आम्ही काम करतो आहोत. हे काम करत असताना प्रत्येकाची वेगवेगळी जबाबदारी वाटण्यात आली आहे.लोकसभेच्या तयारीला राष्ट्रवादी काँग्रेसने केव्हाच सुरुवात केली आहे. त्याबाबत अनेक बैठका झाल्या आणि सविस्तर चर्चाही झाल्या आहेत. त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये या चर्चा घेतल्या जातील असेही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

अमिताभ बच्चन सर्वांना सगळ्याच सिनेमात हवा असतो. त्यांचा आवाजही चालतो, त्यांचा फोटोही चालतो, त्यांचा लूकपण चालतो, त्यांचा ऑटोग्राफही चालतो. त्यामुळेच अजितदादा महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन आहेत असे स्पष्ट करत खासदार सुप्रिया सुळे यांनी अजितदादांवर होत असलेल्या चर्चेला उत्तर दिले.