दिलदार वीरेंद्र सेहवाग; ओडिशा रेल्वे दुर्घटनेतील मृतांच्या मुलांसाठी मदतीचा हात केला पुढे

ओडिशातील (Odisha Railway Accident) बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर देशभरात शोककळा पसरली आहे. या घटनेत २८८ जणांना आपले प्राण गमवावे लागले असून जखमी प्रवाशांची संख्या १००० हून अधिक आहे. अपघातानंतर लोक आपापल्या परीने मदतीसाठी पुढे येत आहेत. दरम्यान, भारताचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) मदतीचा हात पुढे केला आहे.

वीरेंद्र सेहवागने ट्विट करून या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त करताना सांगितले की, या दुःखाच्या प्रसंगी रेल्वे दुर्घटनेत प्राण गमावलेल्यांच्या मुलांना मोफत शिक्षण देणार आहोत. त्याने ट्विट केले आणि लिहिले की, “हे चित्र आपल्याला दीर्घकाळ त्रास देईल. या दु:खाच्या प्रसंगी या दुर्घटनेत ज्यांनी प्राण गमावले त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची काळजी घेणे एवढेच मी करू शकतो. मी अशा मुलांना सेहवाग इंटरनॅशनल स्कूलच्या बोर्डिंग सुविधेत मोफत शिक्षण देईन.”

याशिवाय सेहवागने या अपघातानंतर बचाव कार्य करणाऱ्यांपासून वैद्यकीय कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांना सलाम केला. या अपघाताने सर्वांनाच हादरवले आहे. या अपघातामुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. या अपघातात तीन रेलगाड्या एकमेकांवर आदळल्या. सर्वप्रथम, कोरोमंडल एक्स्प्रेस शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास बालासोरच्या बहंगा बाजार स्थानकाजवळ उभ्या असलेल्या मालगाडीला धडकली, त्यामुळे रेल्वेचे डबे रुळावरून घसरले.

दरम्यान, तेथून जाणारी बेंगळुरू-हावडा एक्स्प्रेस कोरोमंडल एक्स्प्रेसच्या रुळावरून घसरलेल्या डब्यांना धडकली. अशातच हा भीषण अपघात झाला. अशात तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या. हा भारतातील सर्वात मोठा रेल्वे (Biggest Railway Accident In India) अपघात होता.