‘अंधेरी पोटनिवडणूकीत शिवसेनेला राष्ट्रवादीचा पाठिंबा:दणदणीत विजय मिळविला जाईल’

मुंबई – अंधेरी पोटनिवडणूकीत उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जाहीर पाठिंबा असून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी तशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेची ही जागा प्रचंड मताने निवडून येईल असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी यावेळी व्यक्त केला. स्वतःला शिवसेना म्हणवून घेणार्यांना या निवडणुकीत भाजपने साधं विचारलंही नाही आणि भाजपने आपला उमेदवार जाहीर केला आहे. शिवसेना म्हणून शिंदे गटाला जवळ केले असेल तर ती जागा सोडायला हवी होती. मात्र तसे न करता भाजपने शिंदे गटाला डावळून भाजपची उमेदवारी जाहीर केली आहे. यातून भाजपची काय रणनीती आहे हे सर्वसामान्य नागरिकांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे शिवसेनेची ही जागा दणदणीत मतांनी निवडून आणू असा निर्धार महाविकास आघाडीने केला आहे असेही महेश तपासे यांनी स्पष्ट केले.

२०१९ मध्ये महाविकास आघाडीची स्थापना झाली तेव्हापासूनच आमचे व कॉंग्रेसचे समर्थन हे उध्दव ठाकरे यांना आहे. उत्कृष्ट कामगिरी झाली म्हणूनच देशाच्या पाच टॉप मुख्यमंत्र्यांमध्ये उध्दव ठाकरे यांचे नाव आले. आता जो शिंदे गट तयार झाला आहे तो राजकीय षडयंत्राचा भाग होता. त्यामुळे खरी शिवसेना ही बाळासाहेबांच्या आणि उध्दव ठाकरे यांच्या विचारांची शिवसेना आहे. अशा पक्षासोबत राष्ट्रवादी आहे असेही महेश तपासे यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना म्हणाले.

देशातील सर्व पक्षांची मोट बांधून मोदी सरकारच्या विरोधात भूमिका घेण्यासाठी आदरणीय शरद पवारसाहेब हे आग्रही होते आणि आजही आहेत. त्यामुळे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे महाराष्ट्रात येत आहेत तर त्यांचे स्वागत आहे. जे जे लोकं भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी पुढे येत आहेत त्यांना नक्कीच समर्थन असणार आहे. ज्यांची भाजपच्या मनुवादी विचारांच्या विरोधात भूमिका आहे त्यांना राष्ट्रवादी नक्की बळ देईल असेही महेश तपासे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, महेश चव्हाण आदी उपस्थित होते.