मुख्यमंत्र्यांचा बीकेसीवरील मेळावा फेल होता; राष्ट्रवादीचा दावा

मुंबई – काल एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा दसरा मेळावा (Dasara Melava) बीकेसी मैदानावर झाला. वास्तविक राज्यातील जनतेची खूप अपेक्षा होती की, राज्याचे मुख्यमंत्री राज्याला संबोधन करत असतात तेव्हा राज्याच्या हिताच्या योजना किंवा धोरण मांडतील परंतु योजना मिळणं दूर मुख्यमंत्र्यांना भाषणात धोरणही जाहीर करता आलं नाही त्यामुळेच त्यांचा हा मेळावा फेल झाला आहे अशी जोरदार टीका राष्ट्रवादीचे नेते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी केली आहे.

या मेळाव्याला आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील व्यक्तीला बोलावलं असतं तर महाराष्ट्राला आधार मिळाला असता परंतु चंपा थापाला बोलावून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील सदस्यांचा एकप्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपमान केला आहे असा आरोपही महेश तपासे यांनी यावेळी केला.

एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि कॉंग्रेसवर टिका केली. त्यांनी जरुर टिका करावी परंतु अडीच वर्षे महाविकास आघाडीचे (MVA) सरकार असताना हेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या शेजारी बसलेले जनतेने पाहिले आहे आणि त्याकाळात मुंबई व महाराष्ट्राच्या हितासाठी घेतलेल्या सर्व निर्णयामध्ये शिंदे सहभागी होते. त्यामुळे आज टिकेतून दुजाभाव करण्यात आला ही गोष्ट बोलणं योग्य नाही असेही महेश तपासे म्हणाले.

ज्या पध्दतीचे भाषण एकनाथ शिंदे करत होते. समजा काल पाऊस आला असता तर हातासमोरील चिठ्ठी भिजली असती तर नेमकं पुढे काय बोलावं हे सुचलं नसतं असा खोचक टोला लगावतानाच यावेळी महेश तपासे यांनी परमेश्वराला पाऊस न पाडल्याबद्दल लाख आभार मानले.

राजकारणात असताना आणि मुख्यमंत्री म्हणून काम करताना राज्यातील जनतेच्या फार मोठ्या अपेक्षा एकनाथ शिंदे यांच्याकडून होत्या मात्र या सर्व अपेक्षा फोल ठरल्या आहेत. कुठलीही नवीन योजना मोठा मेळावा घेऊनही मांडू शकले नाहीत वैचारिक दिवाळखोरपणा या सरकारचा आहे का अशी शंका महाराष्ट्रातील जनतेच्या मनात निर्माण झाली आहे असा थेट हल्लाबोल महेश तपासे यांनी यावेळी केला.

जी लोकं बीकेसीच्या मैदानावर आली कशी आणली हे संपूर्ण माध्यमातून दाखवण्यात आले. बीकेसीच्या शेजारी असलेले मुंबई विद्यापीठाचे मैदान आहे त्यावर कसल्या बाटल्यांचा खच जमा झाला आहे याचेही चित्रिकरण माध्यमातून झाले आहे. वास्तविक काल आणलेली गर्दी ही दर्दी होती का की पैसे देऊन जमवलेली गर्दी होती याचा निर्णय राज्यातील जनतेने करावा असे सांगतानाच कालच्या शिंदेच्या मेळाव्यातून महाराष्ट्राला काही मिळाले नाही. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे अशा शब्दात महेश तपासे यांनी शिंदे यांच्यावर शरसंधान साधले.