कॉलेज तरुणीला वाचवण्यासाठी कोयत्याचा वार झेलला, ‘त्या’ जिगरबाज तरुणाचं करावं तितकं कौतुक कमीच!

पुण्यात आज दर्शना पवार हत्या प्रकरणाची (Darshana Pawar Murder Case) पुनरावृत्ती होता होता राहिली. एमपीएससी करणाऱ्या तरुणीवर एमपीएससी करणाऱ्या तिच्या मित्राने सदाशिव पेठेत कोयत्याने (MPSC Girl Attacked) हल्ला केला.

या हल्ल्यावेळी त्या मुलीसोबत तिचा आणखी एक मित्र होता. हल्ला झाल्यानंतर ही तरुणी जीव मुठीत धरून धावायला लागली. मात्र तिच्या मागे कोयता घेऊन धावणार्‍या तरूणाला पाहुन कोणीच मदतीला पुढ आलं नाही. जखमी अवस्थेत ती मुलगी धावत होती. एवढ्यात लेशपाल जवळगे (Leshpal Javalage) नावाच्या तरुण त्या मुलीच्या मदतीला धावला. कोयता हातात असलेला तरुण मुलीच्या डोक्यात वार करणार एवढ्यात लेशपाल जवळगेने कोयता पकडला आणि हल्लेखोर तरुणाला रोखले. त्यानंतर इतर लोक पुढे आले आणि हल्लेखोर तरुणाला चोप दिला. त्यानंतर पोलीसांनी हल्लेखोर तरुणाला ताब्यात घेतलय.

स्वत:च्या जीवाची तमा न बाळगता पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या लेशपाल जवळगेने आज धैर्य दाखवलं नसतं तर आज या तरुणीचा जीव गेला असता आणि पुन्हा एकदा दर्शना पवार हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती झाली असती.

“मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. गावाकडून अनेक मुलं पुण्यात शिक्षणासाठी येत असतात. अनेक स्वप्न घेऊन ते आलेले असतात. मात्र अशा घटना पाहून प्रचंड राग येतो. तरुण पीढी शिक्षणाच्या नावाखाली गुन्हेगार होताना दिसत आहे. ही विकृती कमी झाली पाहिजे, तरच मुली सुरक्षित राहतील आणि मुलींनीदेखील मैत्री करताना किंवा त्यांच्या आयुष्यात कोणतंही पाऊल उचलताना एकदा सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. जेणेकरुन या तरुणांच्या मनात भीती निर्माण होईल आणि परिणामी हल्ले किंवा गुन्हे कमी होतील.”, असं लेशपाल जवळगे सांगतो.

https://youtube.com/shorts/7gBsxrixF9c?feature=share