NIAचा दावा : उमेश कोल्हेच्या हत्येनंतर आयोजित करण्यात आली बिर्याणी पार्टी

अमरावती – अमरावतीचे केमिस्ट उमेश कोल्हे (Chemist Umesh Kolhe) यांच्या हत्येप्रकरणी दोन नवीन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) शुक्रवारी येथील विशेष न्यायालयात दिली. हत्येचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आयोजित ‘बिर्याणी पार्टी’मध्ये (Biryani party) ते उपस्थित होते. बुधवारी अमरावती येथून अटक करण्यात आलेले आरोपी मौलवी मुशफिक अहमद (४१) आणि अब्दुल अरबाज (२३) (Accused Maulvi Mushfiq Ahmed and Abdul Arbaaz) यांना ताब्यात घेण्याची विनंती करताना एनआयएने हा आरोप केला.

विशेष न्यायाधीश ए.के. लाहोटी (Judge A.K. Lahoti) यांनी त्याला १२ ऑगस्टपर्यंत एनआयए कोठडीत पाठवले आहे. या दोघांनी हत्येनंतर इतर आरोपींना लपून बसण्यास मदत केल्याचे तपास संस्थेने न्यायालयाला सांगितले. एनआयएने (NIA) असा दावा केला आहे की, हत्याकांडानंतरचा आनंद साजरा करण्यासाठी ‘बिर्याणी पार्टी’ आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये मुशफिक आणि अब्दुल उपस्थित होते.

आरोपींचे वकील काशिफ खान (Kashif Khan) यांनी त्यांना कोठडीत पाठवण्यास विरोध केला. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने दोन्ही आरोपींना १२ ऑगस्टपर्यंत एनआयए कोठडी सुनावली. प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपच्या (BJP) निलंबित नेत्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांचे समर्थन करणारी पोस्ट शेअर केल्याबद्दल 21 जून रोजी अमरावती शहरात कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.