सर्वांचीच सकाळ खराब करणाऱ्यांची सकाळ खराब झाल्याचं बघून समाधान वाटतंय – नितेश राणे

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेची बाजू एकहाती लावून धरणारे खासदार संजय राऊत यांच्या घरावर ईडीने धाड टाकली आहे. गेल्या चार तासांपासून संजय राऊत (Sanjay Raut) यांची ईडीच्या अधिकाऱ्यांकडून कसून चौकशी सुरु आहे. सध्याच्या एकूण घडामोडी पाहता संजय राऊत यांना ईडीकडून (ED) अटकही केली जाऊ शकते. पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई होत असल्याचे सांगितले जात आहे.

या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्या टीकेमुळे दुखावले गेलेले भाजप आणि शिंदे गटाचे नेते आता त्यांच्यावर तुटून पडले आहेत. याच दरम्यान आता भाजप आमदार नितेश राणे यांनी देखील हल्लाबोल केला आहे.रोज सकाळी आपल्या सर्वांची सकाळ खराब करणाऱ्यांचीच सकाळ आता खराब झाल्याने, निश्चितपणे समाधान वाटत आहे. तसेच पत्रचाळमध्ये जे गरीब रहिवासी होते, जे मराठी कुटंब होते. त्यांना आज खऱ्या अर्थाने न्याय मिळेल, असा मला विश्वास आहे, असे वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केले आहे.

संजय राऊत नावाचा व्यक्ती स्वतःला फार मोठं समजायची आणि झुकेगा नही वैगेरे डायलॉक म्हणायची, आता त्यांना विचारा आतमध्ये… शेवटी भ्रष्टाचार करायचा, महिलांवर अत्याचार करायचा, त्यांना त्रास द्यायचा आणि त्यांना वाटत असेल, की त्यांना कधीच काही होणार नाही. तर आता त्यांना, ईडीची चौकशी काय असते आणि दुसऱ्यांना त्रास देणे काय असते. हे निश्चित कळत असेल.असं ते म्हणाले.