एक दिवस महाराष्ट्रातही आपला भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही; गडकरींनी व्यक्त केला विश्वास

नागपूर : नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत चार राज्यांमध्ये भाजपला सत्ता मिळाली. या विजयात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Former Chief Minister Devendra Fadnavis) आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. याबद्दल दोन्ही नेत्यांचा आज नागपुरात भाजपच्या वतीनं जाहीर सत्कार करण्यात आला.

यावेळी भाषणादरम्यान नितीन गडकरींनी फडणवीसांचं तोंडभरुन कौतुक केलं. दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांच्या काळातही मिळालं नव्हतं इतकं यश फडणवीसांनी मिळवल्याचं यावेळी ते म्हणाले. तसंच महाराष्ट्राच्या बाबतीतही मोठं विधान केलं आहे.

यावेळी गडकरींना राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेवर निशाणा साधत म्हटलं की, “गोव्यात अनेक पक्ष उतरले होते. भाजपाला अपशकून देण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेने कंबर कसली होती. रोज वर्तमानपत्रात मुलाखत देऊन भाजपाचा पराभव कसा करता येईल यासाठी प्रयत्न करत होते. पण गोव्याच्या जनेतेमध्ये त्यांचं काय स्थान आहे हे समोर आलं. यानिमित्ताने हीदेखील एक चांगली गोष्ट घडली”.

“गोव्यात महाराष्ट्रातील कार्यकर्ते भेटले. फडणवीसांच्या नेतृत्वात काम केलेल्या या सर्वांचं मी अभिनंदन करतो. हा विजय आता थांबवणार नाही. ही विजयाची पताका एक दिवस महाराष्ट्रातही आपला भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे,” असं गडकरी यावेळी म्हणाले.