योगींचा धसका : एन्काऊंटरच्या भीतीने गुन्हेगार स्वतः करत आहेत पोलिसांच्या समोर आत्मसमर्पण

लखनौ – उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुका संपल्या असून आता सरकार स्थापनेची तयारी सुरू आहे. राज्यात पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष (भाजप) सरकार स्थापन करणार आहे, पण या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेचा मुद्दा बुलडोझर होता. मतमोजणीनंतरही भाजपला घवघवीत बहुमत मिळाल्याने भाजप कार्यकर्त्यांनी राज्यात ठिकठिकाणी बुलडोझर चालवून विजय साजरा केला.

एकीकडे योगी बाबांचा बुलडोझर राज्यातील छोट्या-मोठ्या माफियांच्या बेकायदेशीर मालमत्तांवर चालवला जात असतानाच आता यूपीतील गुन्हेगारांचे एन्काउंटरही सुरु झाले आहेत. यामुळे गुन्हेगारांमध्ये भीती इतकी वाढली आहे की, आता गुन्हेगार स्वत:च पोलिस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण करत आहेत. आज आपण बुलडोझर कुठे चालवला गेला, कुठे पोलीस चकमक झाली आणि कुठे गुन्हेगार आणि हिस्ट्रीशीटर स्वत: पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले ते जाणून घेऊया.

मेरठमध्ये 15 मार्च रोजी पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेल्या बदनसिंग बद्दो आणि त्याच्या साथीदाराच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आणि अतिक्रमण हटवण्यात आले. याआधी बदनसिंग बद्दो यांची करोडो रुपयांची कोठीही पाडण्यात आली होती. याशिवाय हापूरच्या गढमुक्तेश्वर नगरपरिषदेच्या हद्दीत येणाऱ्या बृजघाट येथील महामृत्युंजय धाम आणि शनी मंदिराजवळील महापालिकेच्या जागेवर गेल्या काही महिन्यांपासून भूमाफियांनी बेकायदेशीरपणे कब्जा केला होता. याठिकाणी असणारे अतिक्रमण सुद्धा हटवण्यात आले आहे.

कानपूरमध्ये देखील तलावाच्या जागेवर भूमाफियांनी बेकायदेशीरपणे बांधकाम केले होते, जे कानपूर विकास प्राधिकरणाने पाडले आहे. दरम्यान, सरकार स्थापनेपूर्वी उत्तर प्रदेशातील भाजप सरकारने उचललेल्या पावलांमुळे भूमाफियांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

हापूरमध्ये चकमकीनंतर गुंडाला अटक

हापूरमध्ये 15 मार्चच्या रात्री उशिरा लाखो रुपयांच्या विद्युत तारा चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या टोळीशी पोलिसांची चकमक झाली आणि पोलिसांनी केलेल्या प्रत्युत्तरात दोन गुंडांच्या पायाला बंदुकीच्या गोळ्या लागल्या. यानंतर आता पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

17 मार्च रोजी, आझमगडच्या बरदाह पोलिस स्टेशन अंतर्गत आंतरजिल्हा दरोडेखोर टोळीच्या म्होरक्याला मिशन क्लीनच्या ऑपरेशनमध्ये चकमकीनंतर अटक करण्यात आली. याशिवाय मुझफ्फरनगरमध्ये तपासणीदरम्यान पोलिस आणि दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांमध्ये चकमक झाली. गोंडा येथे, पोलिसांनी चकमकीदरम्यान दोन गुन्हेगारांना अटक केली आहे, ज्यामध्ये राजकुमार यादव नावाच्या एका बदमाशाच्या पायात गोळी लागली होती. दोघांवर 25 हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले. छापिया पोलीस स्टेशन परिसरात ही चकमक झाली.

सहारनपूरच्या चिलकाना पोलिस ठाण्यात अकरा हिस्ट्री शीटर्स लाइन लावून आत्मसमर्पण केले. तर गागलखेडी पोलीस ठाण्यात आठ हिस्ट्री शीटर गुन्हेगारांनी भविष्यात गुन्हे न करण्याची शपथ घेतली. सोमवारी सरसाव्यातील अवैध दारू व्यवसायात गुंतलेल्या चार गुन्हेगारांनी पोलीस ठाणे गाठून भविष्यात गुन्हे न करण्याची शपथ घेतली.

याशिवाय 25 हजार रुपयांचे इनाम असलेला आणखी एका गुन्हेगाराने आत्मसमर्पण केले. एका व्यावसायिकाच्या अपहरणाच्या गुन्ह्यात हा बदमाश फरार होता. पोलिस स्टेशनमध्ये पोहोचलेल्या या बदमाशाने हातात एक पोस्टर घेतले होते, ज्यामध्ये लिहिले होते- ‘मी आत्मसमर्पण करत आहे, मला गोळी घातली जाऊ नये.’ हा गुन्हेगार समोर आल्यावर पोलिसांना देखील आश्चर्य वाटले.