नितीशकुमारांच्या मुलाने ‘या’ बाबतीत आपल्या वडिलांनाही टाकले मागे

नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी त्यांच्या संपत्तीबाबत घोषणा केल्या आहेत. या घोषणा पाहता त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक सदस्य हे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यापेक्षा श्रीमंत असल्याचे समोर आले आहे.  इतकंच नाही तर त्यांचा मुलगा निशांत (निशांत कुमार) देखील नितीशकुमार यांच्या पेक्षा श्रीमंत आहे असं समोर आले आहे.

2010 मध्ये नितीश सरकारने सरकारच्या सर्व मंत्र्यांना प्रत्येक वर्षाच्या पहिल्या तारखेला त्यांच्या संपत्तीचा तपशील सार्वजनिक करणे बंधनकारक केले होते.कॅबिनेट सचिवालय विभागाच्या वेबसाइटवर मंत्र्यांनी दिलेल्या त्यांच्या मालमत्तेच्या तपशीलानुसार, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडे सध्या २९,३८५ रुपये रोख आहेत. नितीश यांच्याकडे 16 लाख 51 हजार रुपयांची जंगम आणि 58 लाख 85 हजारांची स्थावर मालमत्ता आहे. त्याचवेळी त्यांचा मुलगा निशांत हा एक कोटी 63 लाख आणि एक कोटी 98 लाखांच्या जंगम आणि स्थावर मालमत्तेचा मालक आहे.

मुख्यमंत्र्यांना गायी पाळण्याची आवड आहे

नितीश कुमार यांच्याकडे 11 लाख 32 हजार किंमतीची कार आहे, तर त्यांचा मुलगा 6 लाख 40 हजार किंमतीची कार चालवतो. नितीश कुमार यांना गायी पाळण्याचाही शौक आहे. सध्या त्यांच्याकडे 13 गायी आहेत. याशिवाय मुख्यमंत्र्यांचा दिल्लीतील द्वारका येथे फ्लॅट आहे, ज्याची किंमत सध्या 58 लाखांच्या आसपास आहे. मुख्यमंत्र्यांच्या बँक खात्यात 42 हजारांची रक्कम जमा आहे, तर ते सुमारे 94 हजार किमतीच्या दागिन्यांचे मालक आहेत.

दरम्यान, मंत्रिमंडळातील सर्वात श्रीमंत मंत्र्यांच्या यादीत मुकेश साहनी यांचाही समावेश आहे. पशुसंवर्धन व मत्स्यव्यवसाय विभागाचे मंत्री साहनी यांच्याकडे सुमारे एक कोटी ३१ लाख रुपयांची जंगम मालमत्ता असून आठ कोटी ३४ लाखांची स्थावर मालमत्ता आहे. मुकेश साहनी यांच्या पत्नीकडेही 1 कोटी 37 लाखांची स्थावर आणि 51 लाखांची जंगम मालमत्ता आहे. साहनी यांची मुंबईत एक व्यावसायिक इमारतही आहे.

जलसंपदा मंत्री संजय कुमार झा यांच्याबद्दल बोलताना त्यांची पत्नी त्यांच्यापेक्षा श्रीमंत आहे. झा यांच्याकडे जंगम मालमत्ता म्हणून 98 लाख 95 हजार, तर त्यांच्या पत्नीकडे 7 कोटी 36 लाखांची संपत्ती आहे. यामध्ये दोघांच्या नावे विविध बँकांमध्ये ठेवी, एलआयसी, सोने, चांदी आणि वाहनांची खरेदी यांचा समावेश आहे.