‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात श्रीराम अक्षता कलशाचे पूजन; पुणेकरांची मोठ्या संख्येने उपस्थिती

Shriram Akshata Kalash poojan  : सियावर रामचंद्र की जय… पवनसुत हनुमान की जय… जय श्रीराम…जय गणेश च्या नामघोषाने ‘दगडूशेठ’ गणपती मंदिराचा परिसर रामनाम मय झाला होता. श्रीराम अक्षता कलशाचे आगमन मंदिरात होताच, पुष्पवृष्टी करण्यात आली. तर, ट्रस्टच्या विश्वस्तांनी डोक्यावर कलश घेऊन श्रींच्या मूर्तीसमोर कलशाचे विधिवत पूजन केले.

श्रीराम लल्ला प्रतिष्ठान मोतीबाग नगर समितीतर्फे श्रीराम अक्षता कलश प्रदान सोहळा शोभायात्रेचे आयोजन सदाशिव पेठेतील रहाळकर राम मंदिर ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर करण्यात आले होते. यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेमंत रासने म्हणाले, प्रत्येक रामभक्तांची जी इच्छा होती, तो संकल्प पूर्ण होत आहे. रा.स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत मंदिरात अभिषेकाला आले होते. त्यावेळी राम मंदिराचा संकल्प अभिषेकाद्वारे गणरायाकडे करण्यात आला होता. त्यानंतर एक महिन्याच्या आत सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराचा मार्ग मोकळा केला होता. त्यानंतर ट्रस्टतर्फे अयोध्या राम मंदिर प्रतिकृती आणि श्रीं ची प्रतिष्ठापना मोहन भागवत यांच्या हस्ते यंदा गणेशोत्सवात करण्यात आली होती. जानेवारीमध्ये अयोध्येत जाणे शक्य नसेल तरी सगळ्या मंदिरात मोठ्या प्रमाणात आपण उत्सव साजरा करावा, असे आवाहनही त्यांनी केले.