राज्यसभेसाठी प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीबाबत काँग्रेसकडून कोणताही प्रस्ताव नाही : वंचित बहुजन आघाडी

मुंबई – राज्यसभेच्या जागांसाठी कोणत्या पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळणार यावरुन सगळ्याच पक्षात चढाओढ पाहायला मिळत आहे. काँग्रेसकडून राज्यसभेच्या उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची जोरदार चर्चा रंगली असतानाच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना उमेदवारी दिली जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता वंचित बहुजन आघाडीने हे वृत्त फेटाळलं आहे.

याबाबत वंचितने प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. यात ॲड. बाळासाहेब आंबेडकर (Adv. Balasaheb Ambedkar) यांना काँग्रेसकडून (Congress) राज्यसभेची उमेदवारी मिळणार असल्याची बातमी माध्यमांमधून प्रसारित करण्यात आली आहे. या बातमी मध्ये काहीही तथ्य नाही. काँग्रेस कडून आम्हाला असा कोणताही प्रस्ताव अद्याप प्राप्त झालेला नाही. असं म्हटलं आहे.

निवडणुका जवळ आल्या की काँग्रेसमधील एक गट माध्यमातील काही लोकांना हाताशी धरून खोट्या बातम्या पेरण्याचे काम करीत असतो. अशा खोट्या बातम्या पेरून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा व वंचित बहुजन आघाडीची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.