‘संजय राऊत यांनी आतापर्यंत ज्या डरकाळ्या फोडल्या त्यातील एकही गोष्ट सत्य झाली नाही’

जळगाव – शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर ईडीने (ED)कारवाई करत त्यांची संपत्ती जप्त केली आहे. यामध्ये राऊत यांच्या अलिबागमधील आठ भूखंड आणि दादरच्या फ्लॅटचा समावेश आहे. एक हजार 34 कोटींच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली असल्याचं सांगितलं जातंय.

पत्राचाळ घोटाळ्यातील पैसे हे अलिबाग येथील जमीन खरेदीसाठी वापरली म्हणून ही कारवाई केली असून, श्रीधर पाटणकर यांच्यानंतर शिवसेनेच्या मोठ्या नेत्यावर ईडीने ही कारवाई केली आहे. दरम्यान, या कारवाईचे आता राजकीय पडसाद उमटू लागले असून संपूर्ण महाविकास आघाडी आता राऊत यांचा बचाव करताना दिसत आहे. दुसऱ्या बाजूला विरोधक आक्रमक झाले असून राऊत यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

यातच आता भाजपचे जेष्ठ नेते गिरीश महाजन यांनी राऊत यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, खोटे बोल पण नेटाने बोल ही म्हण संजय राऊत यांना तंतोतंत लागू होते. संजय राऊत यांनी आतापर्यंत ज्या डरकाळ्या फोडल्या त्यातील एकही गोष्ट सत्य झाली नाही. केवळ वल्गना करत असून प्रसिद्धीसाठी मोठ्याने ते बोलत आहेत. मात्र, आता सर्व कागदपत्रांची तपासणी होईल त्या नंतर सर्व समोर येईल. काहीतरी असल्याशिवाय ईडी कार्यवाही करून प्रॉपर्टी पर्यंत जाणार नाही. त्यांचे पाप पुण्य राज्याच्या समोर आले आहे. त्यांना आता कुठलीही सहानुभूती मिळणार नसल्याची टीका गिरीश महाजन यांनी केली ( Girish Mahajan Reply Sanjay Raut ) आहे.