‘पाच नव्हे तर पुढील पंचवीस वर्ष शिवसेना सत्तेत असेल आणि उद्धव साहेब तुम्हाला मुख्यमंत्री दिसतील’

मुंबई – शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर ईडीने (ED)कारवाई करत त्यांची संपत्ती जप्त केली आहे. यामध्ये राऊत यांच्या अलिबागमधील आठ भूखंड आणि दादरच्या फ्लॅटचा समावेश आहे. एक हजार 34 कोटींच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली असल्याचं सांगितलं जातंय.

पत्राचाळ घोटाळ्यातील पैसे हे अलिबाग येथील जमीन खरेदीसाठी वापरली म्हणून ही कारवाई केली असून, श्रीधर पाटणकर यांच्यानंतर शिवसेनेच्या मोठ्या नेत्यावर ईडीने ही कारवाई केली आहे. दरम्यान, या कारवाईचे आता राजकीय पडसाद उमटू लागले असून संपूर्ण महाविकास आघाडी आता राऊत यांचा बचाव करताना दिसत आहे. दुसऱ्या बाजूला विरोधक आक्रमक झाले असून राऊत यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

यातच आता युवसेनेचे वरून सरदेसाई यांनी संजय राऊत यांना पाठींबा देत भाजपवर टीका केली आहे. ते म्हणाले, संजय राऊत यांचा गुन्हा काय? हे भाजपचे नेते सुद्धा सांगू शकणार नाही.. दीड महिने विधानसभा निवडणुकीनंतर संजय राऊत बोलले.. त्यांच्या प्रयत्नांनी भाजपचे १०५ आमदार घरी बसवले आणि सेनेचा मुख्यमंत्री बनवून दाखवला हाच त्यांचा गुन्हा आहे. हा राग राऊत यांच्याबाबत असून त्यातूनच या कारवाया सुरु असल्याचा दावा त्यांनी केला आहे. आमदार नाराज असल्याच्या विरोधक अफवा उठवत आहेत परंतु उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली पुढचे पाच नव्हे तर पुढील पंचवीस वर्ष शिवसेना सत्तेत असेल आणि उद्धव साहेब तुम्हाला मुख्यमंत्री दिसतील असं ते म्हणाले.