मलिक-देशमुखांना तुरुंगात डांबून जामीन मिळू न देणे हा राजकीय क्रूरपणा आहे – लवांडे

मुंबई – मनी लाँड्रिंगच्या (money laundering case) आरोपांचा सामना करत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (ED on Nawab Malik) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. विशेष न्यायालयाने नवाब मलिकविरुद्धच्या खटल्याची सुनावणी करताना ईडीने सादर केलेल्या आरोपपत्राची दखल घेतली. यावर कोर्टाने नवाब मलिक यांचे डी-गँगशी (d company) संबंध होते असं निरीक्षण नोंदवलं आहे.

नवाब मलिक (Nawab Malik) यांचा थेट मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात सहभाग होत असेही न्यायालयाने म्हटले आहे. याशिवाय नवाब मलिकांनी गोवावाला कंपाऊंड मिळवण्यासाठी कट रचल्याचा ठपका ईडीने ठेवला आहे. मंत्री नवाब मलिक यांनी हसीन पारकरसोबत वारंवार बैठका घेतल्या आणि मनी लाँड्रिंग केलं असं निरीक्षणही कोर्टाने नोंदवलं आहे.

दरम्यान, न्यायालयातील या घडामोडींवरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून सत्ताधाऱ्यांची मलिक यांच्यामुळे चांगलीच गोची झाली आहे. यातच आता राष्ट्रवादीचा न्यायालयीन प्रक्रियेवर आता विश्वास राहिला आहे की नाही असा सवाल उपस्थित करण्याची वेळ आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते विकास लवांडे यांनी केलेल्या एका पोस्टमुळे हा सवाल उपस्थित होत आहे.

लवांडे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, ना.नवाबभाईमलिक आणि ना. अनिलजी देशमुख यांच्याविरुद्ध भाजप प्रणित केंद्रीय तपास यंत्रणांनी आरोप सिद्ध करून दाखवल्यानंतर मा.कोर्टाचे अंतिम निकाल मिळतील. तोपर्यंत जाणीवपूर्वक त्यांना तुरुंगात डांबून जामीन मिळू न देणे हा राजकीय क्रूरपणा आहे. हे खुनशी राजकारण अत्यंत निंदनिय आहे. वास्तविक तपास पूर्ण झाल्यानंतर (अपवाद गंभीर गुन्हे वगळता ) कोणत्याही आरोपींना योग्य त्या न्यायिक प्रक्रियेनंतर जामीन मिळणे हा अधिकार असतो. आरोप सिद्ध होण्याआधीच शिक्षा भोगणे हा अन्याय आहे. भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा वारंवार गैरवापर केला जात असल्याचे स्पष्ट होत आहे.

भाजपने जे लढायचे ते निवडणुकीच्या मैदानात समोरासमोर लढावे. आजपर्यंत भाजपने विविध नेत्यांवर केलेल्या विविध आरोपापैकी एकही आरोप कुठेही सिद्ध केलेला नाही. मला विश्वास आहे की दोन्ही नेते निर्दोष सुटतील.असं देखील लवांडे म्हणाले आहेत.