आता निलेश राणेंच्याही अडचणी वाढल्या; पोलिसांसोबत हुज्जत घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल

सिंधुदुर्ग : राणे कुटुंबीयांवर गुन्हे दाखल होण्याचे सत्र सुरूच असल्याचे दिसत आहे. कारण आधी केंद्रीय मंत्री नारायण राणे मग आमदार नितेश राणे आणि आता भाजप नेते निलेश राणे यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांचा जामीन सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयानं फेटाळल्यानंतर न्यायालयाच्या आवारातच हा व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. यानंतर आता माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

सिंधुदुर्ग न्यायालयात पोलिसांसोबत हुज्जत घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच न्यायालयाच्या आवारात बेकायदेशीरपणे जमाव करणे, सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग करणे यासह अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार, जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी 188 आणि 269, 270,  तसेच  पोलिसांशी हुज्जत घातल्या प्रकरणी 186 कलमांनुसार सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात काल रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   कोर्टाने नितेश राणेंना जामीन अर्ज नाकारल्यानंतर ते कोर्टातून निघत असताना पोलिसांनी त्यांची गाडी अडवली. यावेळी त्यांचे बंधू आणि माजी खासदार निलेश राणे गाडीतून खाली उतरले आणि पोलिसांना गाडी का थांबवली असा जाब विचारला.

यावेळी त्यांचे समर्थकही आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. सुप्रीम कोर्टाच्या आदेशापेक्षा काय महत्वाचं आहे ते सांगा अशी विचारणा यावेळी त्यांनी केली. कोणत्या अधिकाराखाली गाडी अडवली जात आहे अशी विचारणा करत त्यांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, जमावबंदीचे उल्लंघन राज्यातील अनेक नेत्यांकडून केले जाते, मग कारवाई फक्त निलेश राणेंवरच का ? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.