‘जमावबंदीचे उल्लंघन राज्यातील अनेक नेत्यांकडून केले जाते ,मग कारवाई फक्त निलेश राणेंवरच का?’

पुणे    – राणे कुटुंबीयांवर गुन्हे दाखल होण्याचे सत्र सुरूच असल्याचे दिसत आहे. कारण आधी केंद्रीय मंत्री नारायण राणे मग आमदार नितेश राणे आणि आता भाजप नेते निलेश राणे यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांचा जामीन सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयानं फेटाळल्यानंतर न्यायालयाच्या आवारातच हा व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. यानंतर आता माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

सिंधुदुर्ग न्यायालयात पोलिसांसोबत हुज्जत घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच न्यायालयाच्या आवारात बेकायदेशीरपणे जमाव करणे, सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग करणे यासह अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार, जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी 188 आणि 269, 270,  तसेच  पोलिसांशी हुज्जत घातल्या प्रकरणी 186 कलमांनुसार सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात काल रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, हा गुन्हा दाखल झाल्यानंतर आता भूमाता ब्रिगेडच्या सर्वेसर्वा तृप्ती देसाई यांनी सरकारवर टीका केली आहे. त्या म्हणाल्या, नितेश राणे यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. काल न्यायालयाच्या आवारात माजी खासदार निलेश राणे पोलिसांना न्यायालयाच्या आवारात सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार जाब विचारताना दिसत होते, त्यात काहीच चुकीचे नव्हते. यापुढे पोलिसांना कोणी जाब विचारायचं नाही का? ही हुकूमशाही कधीपासून आली आपल्या राज्यात…. जमावबंदीचे उल्लंघन राज्यातील अनेक नेत्यांकडून केले जाते ,मग कारवाई फक्त निलेश राणेंवरच का?…. आपल्या राज्यात कायदा समान नाही का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

शिवसेना आणि राणे कुटुंबियांचा वाद सर्वांना ज्ञात आहेच परंतु शिवसेनेने राणे कुटुंबियांना कोंडीत पकडण्यासाठी पोलिसांना आणि महाविकासआघाडीतील  इतर २ पक्षांना हाताशी धरून सत्तेचा गैरवापर चालू आहे का? याबाबत आपण सर्वांनी सरकारला जाब विचारलाच पाहिजे. की आम्ही याबाबत जाब विचारतोय म्हणून आमच्यावर ही गुन्हा दाखल होणार असा सवाल देसाई यांनी उपस्थित केला आहे.