‘आता राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील करात कपात करावी आणि सामान्यांना आणखी दिलासा द्यावा’

मुंबई – इंधनांवरील केंद्रीय उत्पादन शुल्क कमी करत असल्याची घोषणा काल वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. यामुळे पेट्रोलच्या दरात प्रतिलीटर साडे नऊ रुपयांची घट होणार असून डिझेलचे दर 7 रुपयांनी कमी होणार आहेत. राज्यांनीही करसवलत लागू करून सामान्यांना दिलासा द्यावा, असे निर्देश सीतारामन यांनी दिले आहेत. या वर्षी सरकार पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या 9 कोटी पेक्षा जास्त लाभार्थ्यांना 12 सिलिंडरपर्यंत प्रति गॅस सिलिंडर 200 रुपये अनुदान देईल अशी घोषणाही त्यांनी केली.

दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे ८ रुपये आणि ६ रुपये प्रतिलिटर केंद्रीय कर कमी करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अनेकानेक आभार! यासाठी केंद्र सरकार प्रतिवर्ष १ लाख कोटी रुपये इतका भार सहन करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति सिलेंडर २०० रुपये सबसिडी देण्याचा सुद्धा निर्णय घेतला आहे आणि यासाठी ६१०० कोटी रुपये आर्थिक भार येणार आहे, असे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

केंद्रातील मोदी सरकार हे या देशातील सामान्य माणसाचे सरकार आहे, हेच पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिद्ध केले आहे. गरिब कल्याण हा त्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय आणि त्यासाठी ते सतत झटत असतात. या निर्णयांमधून त्यांनी हेच प्रत्यंतर पुन्हा एकदा दिले आहे. आता माझी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र सरकारला पुन्हा एकदा विनंती आहे की, त्यांनी पुढाकार घेत पेट्रोल आणि डिझेलवरील करात कपात करावी आणि सामान्यांना आणखी दिलासा द्यावा. कारण, महाराष्ट्रातील दर हे सर्वाधिक आहेत. सत्तेतील पक्षांनी रस्त्यावर बसायचे नसते, तर जनतेला दिलासा द्यायचा असतो, असेही फडणवीस म्हणाले.