राऊत, पटेल, गोयल यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपणार, 57 जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

नवी दिल्ली – राज्यातील जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीचा काल निकाल जाहीर झाला. त्यानंतर आज केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) राज्यसभेच्या 57 जागांसाठी निवडणुकीचा (Rajya Sabha Election 2022) कार्यक्रम जाहीर केला आहे. देशातील एकूण 15 राज्यांच्या 57 जागांसाठी ही निवडणूक असणार आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या (Maharashtra) सहा जागांचा समावेश आहे. ही निवडणूक 10 जूनला होणार आहे. या निवडणुकीसाठी 31 मे पर्यंत अर्ज सादर करावे लागतील.

महाराष्ट्रातून भाजपच्या ३ जागांमध्ये पियूष गोयल, विनय सहस्रबुद्धे, विकास महात्मे यांची मुदत संपत आहे. तर शिवसेनेचे संजय राऊत, काँग्रेसचे पी. चिदंबरम आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल पटेल यांची मुदत संपली आहे. विधानसभेतील सध्याच्या संख्याबळानुसार भाजपचे २ आणि शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी १ खासदार सहज निवडून येवू शकतात.

भाजपकडून पियूष गोयल, विनय सहस्रबुद्धे, शिवसेनेकडून संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, निवडणूक होत असलेल्या ५७ राज्यसभा खासदारांची मुदत २१ जून ते १ ऑगस्ट या काळात संपत आहे. यात १५ राज्यांमधील खासदारांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील ६ खासदारांची मुदत ४ जुलै २०२२ रोजी संपत आहे.