अपशब्द वापरणं ही यांची संस्कृतीच! संजय राऊतांवर चंद्रकांत पाटलांचा निशाणा

मुंबई : इडीकडून भाजपवर होणाऱ्या कारवाया, किरीट सोमय्यांचे आरोप, केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर या सगळ्या मुद्यांवरून खासदार संजय राऊत यांनी आज भाजपवर निशाणा साधला. यावेळी शिवसेना भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे अनेक खासदार, आमदार उपस्थित होते. संजय राऊत यांची पत्रकार परिषद संपल्यानंतर आता भाजपच्या नेत्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्या पत्रकार परिषदेला ‘खोदा पहाड निकला चुहा’ असं म्हटलं आहे.

गेले दोन ते तीन दिवस काहीतरी प्रचंड मोठी गोष्ट बाहेर काढणार, अशा अविर्भावात संजय राऊत जगत होते. जगात कोणाची पत्रकार परिषद झालीच नाही, यांचीच पहिल्यांदा होत आहे, असे हे वागत होते. या सर्वातून खोदा पहाड निकला चुहा असं सिद्ध झालेलं आहे, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.

इडीच्या माध्यमातून मला नाहक त्रास देत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी भाजपवर केला आहे. यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, न्यायालय हे उत्तम माध्यम आहे. संजय राऊतांनी तिथे जायला हवं. गेले २७ महिने आम्ही न्यायालयाच्या न्यायामुळेच टिकून आहोत. महाविकास आघाडी अजूनही एकही केस न्यायालयात जिंकू शकले नाही. दुसरी गोष्ट म्हणजे अपशब्द वापरणं ही यांची संस्कृतीच आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील ट्विट केलं आहे. त्या ट्विट मध्ये असं म्हटलं आहे की, ‘आज फिर एकबार बिल्ली ने दहाड़ने कोशिश की है’. असं म्हणत अमृता फडणवीस यांनी संजय राऊत यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.