फिफा महिला फुटबॉल विश्वचषक विजेत्या स्पेनला मिळाली टी२० विश्वचषकापेक्षाही जास्त बक्षीस रक्कम

स्पेन संघाने फिफा महिला फुटबॉल विश्वचषकाचे (Fifa Womens Football World Cup) विजेतेपद पटकावले आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांनी आयोजित केलेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात स्पेनच्या महिला फुटबॉल संघाने इंग्लंडच्या महिला फुटबॉल संघाचा 1-0 असा पराभव केला. स्पेनने प्रथमच महिला विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे. विश्वचषकाच्या चकचकीत ट्रॉफीशिवाय स्पेनला $4.29 दशलक्ष बक्षीस रक्कमही मिळाली आहे. ही रक्कम ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक आणि T20 विश्वचषकाच्या बक्षीसापेक्षा जास्त आहे.

स्पेनच्या महिला फुटबॉल संघाला 35.67 कोटींची बक्षीस रक्कम मिळाली आहे. तर, उपविजेत्या संघाला 3.015 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 25 कोटी 07 लाख रुपये मिळाले आहेत. FIFA महिला विश्वचषक 2023 साठी एकूण बक्षीस रक्कम 110 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 914 कोटी रुपये आहे. विजेत्या आणि उपविजेत्या व्यतिरिक्त, तिसऱ्या संघाला $2.61 दशलक्ष, चौथ्या संघाला $2.455 दशलक्ष, उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरलेल्या संघाला $2.18 दशलक्ष आणि शेवटच्या 16 संघाला $1.87 दशलक्ष बक्षीस रक्कम मिळते.

दुसऱ्या बाजूला 2019 ICC विश्वचषक स्पर्धेतील बक्षिसाची रक्कम 10 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 83 कोटी इतकीच होती. यामध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या संघाला 33 कोटी रुपये, उपविजेत्या संघाला 16.63 कोटी रुपये, उपांत्य फेरीत पात्र ठरलेल्या प्रत्येक संघाला 6.65 कोटी रुपये, साखळी फेरीत विजेत्या संघाला 33 लाख रुपये मिळाले. त्याचप्रमाणे T20 विश्वचषक 2022 च्या विजेत्या संघाला 13 कोटी रुपये, उपविजेत्या संघाला 6.44 कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळाले.

फिफा पुरुष फुटबॉल विश्वचषक आणि फिफा महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या बक्षीस रकमेत मोठी तफावत आहे. अर्जेंटिनाने कतारमध्ये 2022 चा विश्वचषक जिंकला होता. अर्जेंटिनाला 42 मिलियन डॉलर म्हणजेच 347 कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळाले. तर उपविजेत्या फ्रान्सला २४८ कोटी रुपये देण्यात आले. ही रक्कम महिलेच्या बक्षीस रकमेपेक्षा 10 पट कमी आहे. फिफा फुटबॉल विश्वचषकाची एकूण बक्षीस रक्कम $440 दशलक्ष होती.