“आधी अजितदादांकडून माहिती घ्यायला हवी होती…”; रोहित पवारांनी एकनाथ शिंदेंना सुनावलं

राज्यात सध्या कांद्याचा प्रश्न चांगलाच पेटल्याचे पहायला (Onion News) मिळत आहे. कांद्याचे निर्यात शुल्क ४० टक्क्यांपर्यंत वाढवल्यानंतर राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यानंतर केंद्र सकारने दोन लाख मेट्रीक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय जाहीर केला. केंद्र सरकारकडून २४१० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करणार आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. पवार म्हणाले की, केंद्र सरकारचा निर्णय अपेक्षा पूर्ण करणारा नाही. केंद्र सरकारने प्रतिक्विंटलसाठी दिलेला २४१० हा भाव कमी आहे. कांद्याला चार हजार रुपये भाव द्यावा, ही मागणी आहे. २ हजार ४०० रुपयांमध्ये शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघणार नाही. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (EKnath Shinde) यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (AJit Pawar) यांच्या समोरच शरद पवारांना सुनावलं आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, पहिल्यांदा केंद्र सरकारने या प्रश्नावर हस्तक्षेप करत, शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून २०१० रुपये हा भाव देऊन दोन लाख मेट्रीक टन कांदा नाफेडच्या माध्यमातून खरेदीचा निर्णय घेतला आहे. माझा एवढाच सवाल आहे की, आज सहकार्य करून निर्णय घेतला आहे. राज्यसरकार देखील यामध्ये मागे राहणार नाही. केवळ राजकारण न करता आपण सगळ्यांनी शेतकऱ्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे.

पवार साहेब मोठे नेते आहेत. ते सुद्धा १० वर्ष कृषीमंत्री होते. त्या काळात देखील अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण तेव्हा कांद्याला भाव देण्याचा निर्णय त्या संकटकाळात घेण्यात आला नाही. पंतप्रधान मोदी हे महाराष्ट्रात शेतकऱ्यांवर संकट आलं तेव्हा ते उभे राहिले आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे याचं राजकारण करण्यात येऊ नये. केंद्र सरकारने केलेल्या कामाचं स्वागत झालं पाहिजे ना की त्याचं राजकारण केलं पाहिजे.

रोहित पवारांचा एकनाथ शिंदेंना सवाल
यावर आमदार रोहित पवार यांनी एकनाथ शिंदेंना सवाल केला आहे. “एकनाथ शिंदे साहेब पवार साहेब कृषीमंत्री असताना असा निर्णय झाला नाही, असं आपण म्हणालात, पण अजितदादांसोबत पत्रकार परिषदेत आपण हे वक्तव्य करण्याआधी पवार साहेबांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काय निर्णय घेतले होते, याची माहिती अजितदादांकडून घ्यायला हवी होती. ती घेतली असती तर कदाचित आपण हे वक्तव्य केलंच नसतं,” असे रोहित पवार म्हणाले.