देश बिघडविणाऱ्यांना तुम्हीच रोखू शकता; यशोमती ठाकूर यांची तरुणाईला साद

मुंबई : देशाला कुणाची तरी नजर लागली असून आपल्या देशात जी आग लावली जात आहे, ती विझविण्यासाठी आपण तरुणाईने काम केलं पाहिजे. जर देशाला कुणी बिघडवत असेल, तर देशाचे सैनिक म्हणून तुम्ही हे होऊ देऊ नका, अशी साद आज मुंबईकर तरुणाईला महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर (Adv. Yashomati Thakur)यांनी घातली. माटुंगा येथील एम. पी. शहा मुलींच्या कनिष्ठ महाविद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन व गुणगौरव सोहळा आज पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या.

एम. पी. शहा मुलींचे कनिष्ठ महाविद्याल, याचा वार्षिक स्नेहसंमेलन, गुणगौरव सोहळा मुंबई, माटुंगा येथील मानव समाज सेवा मंडळाच्या सभागृहात पार पडला. यावेळी व्यासपीठावर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad), आमदार अमीन पटेल (Amin Patel), विश्वस्त प्रवीण शहा (Pravin Shah), भरत पाठक (Bharat Pathak), प्राचार्या लीना राजे  ( Leena Raje)आदी मान्यवर उपस्थित होते.

एम. पी. शहा मुलींचे कनिष्ठ महाविद्यालय शिक्षणासोबतच सामाजिक जाणिव ठेऊन अतिशय चांगल्याप्रकारे काम करीत आहे. गुण टक्केवारीच्या या युगात येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थिनीला प्रवेश देऊन, प्रसंगी स्वतः शैक्षणिक शुल्क भरून संस्थेने अनोखा आदर्श जगासमोर ठेवला आहे. याबद्दल ॲड यशोमती ठाकूर यांनी संस्थेच्या विश्वस्तांचे कौतुक केले. आमदार अमीन पटेल यांच्या माध्यमातून संस्थेला मिळत असलेल्या सहकार्याबद्दल ॲड. यशोमती ठाकूर यांनी पटेल यांचेही विशेष कौतुक केले. तसेच याबाबत कोणतीही मदत लागल्यास आम्हालाही हक्काने सांगा असे त्या आवर्जून म्हणाल्या. यादरम्यान ॲड यशोमती ठाकूर यांनी मुलींनी सादर केलेल्या विविध कलागुणांना मनसोक्त दाद दिली.

महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन पॉवरफूल वुमेन्स – अमीन पटेल

एम. पी. शहा मुलींचे कनिष्ठ महाविद्यालयाचे काम खूप चांगले चालले आहे. त्यामुळे अशा या महाविद्यालयातील विद्यार्थिनींना प्रेरणा मिळतील अशा व्यक्ती प्रमुख पाहुण्या म्हणून आपण वार्षिक स्नेहसंमेलन, गुणगौरव सोळ्यात आणण्यासाठी प्रयत्नशील होतो. ॲड. यशोमती ठाकूर आणि वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीने आज महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन पॉवरफूल वुमेन्सची थेट भेट या निमित्ताने घडवून आणता आली.