‘राज ठाकरेंच्या सभेमुळे शांतीप्रिय नागरिक चिंतीत; सभेला परवानगी दिली तर रस्त्यावर उतरू’

औरंगाबाद – मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. राज ठाकरे यांनी राज्य सरकारला मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर ३ मेपर्यंत अल्टिमेटम दिलाय. राज्य सरकारला मला सांगायचं आहे की मशिदीच्या भोंग्यांवरून आम्ही मागे हटणार नाही, तुम्हाला काय करायचं असेल ते करा. या गोष्टीचा सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे, असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. तसेच ३ मेपर्यंत मशिदींवरील भोंगे खाली उतरवा, नाहीतर देशात जिथं नमाज वाजेल तिथं हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) लावणार असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. न्यायालयाच्या निकालाचे पालन सर्वांनी करायलाच हवे असं त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, अनेक मुस्लीम संघटनांनी (Muslim organizations) आणि महाविकास आघाडीतील पक्षांनी राज ठाकरेंच्या विधानाचा विरोध केलाआहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज ठाकरेंवर धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप केला. महाराष्ट्रात दंगल घडवण्याच्या हेतूने भोंग्याचे राजकारण केले जात आहे असा आरोप मविआचे नेते करत आहे. त्यामुळे राज्यात भोंग्यांचे राजकारण चांगलंच तापल्याचं दिसून येत आहे. यातच आता राज ठाकरे हे औरंगाबादमध्ये सभा घेणार असल्याने त्याठिकाणी देखील आता संघर्ष निर्माण होऊ लागला आहे. राज यांच्या सभेला वंचितने विरोध दर्शविला आहे.

राज ठाकरे यांच्या १ मे रोजी होणाऱ्या जाहीर सभेला परवानगी देऊ नका, यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडेल, अशी भिती व्यक्त करत वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) या सभेला विरोध दर्शवला आहे. सभेला परवानगी मिळाली तर आम्ही रस्त्यावर उतरून विरोध करू, अशा इशारा देखील वंचितकडून देण्यात आला आहे.

राज यांच्या औरंगाबादमध्ये होऊ घातलेल्या सभेमुळे शहरातील शांतिप्रिय नागरिक चिंतीत झाले असून, त्यांच्या भाषणामुळे शहराची शांतता व सुव्यस्था बिगडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राज यांच्या सभेला परवानगी देऊ नये अशी मागणी ‘वंचित’कडून करण्यात आली आहे.