…अन्यथा नव्या कर्णधाराच्या नेतृत्त्वाखाली खेळावे लागेल; कॅप्टन धोनीची गोलंदाजांना लास्ट वॉर्निंग

चेन्नई- चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स (CSK vs LSG) संघात चेपॉक स्टेडियमवर झालेला आयपीएल २०२३चा सहावा सामना अतिशय रोमांचक राहिला. या सामन्यात दोन्ही संघांच्या फलंदाजांनी धावांची बरसात केली. प्रथम फलंदाजी करताना चेन्नई संघाने निर्धारित २० षटकात ७ बाद २१७ धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनऊला ७ बाद २०५ धावाच करता आल्या आणि चेन्नईने १२ धावांनी सामना जिंकला. हा त्यांचा हंगामातील पहिला विजय आहे.

परंतु या विजयानंतरही चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) संघातील गोलंदाजांवर नाखुश आहे. कारण चेन्नईच्या गोलंदाजांनी लखनऊविरुद्धच्या सामन्यात खूप एक्स्ट्रा धावा दिल्या. जर पुढील सामन्यात गोलंदाजांचे प्रदर्शन सुधारले नाही, तर आपण नेतृत्त्वपदावरुन पायउतार होऊ, अशी चेतावणी स्वत: धोनीने दिली आहे.

सामन्यानंतर पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये बोलताना कर्णधार धोनी म्हणाला, “उच्च स्कोअरिंगसह हा एक उत्कृष्ट सामना होता. आम्हाला प्रश्न पडला होता की, चेपॉकची खेळपट्टी कशी असेल. मला वाटले होते की खेळपट्टी खूप संथ असेल, पण ती अशी खेळपट्टी होती जिथे तुम्ही वेगाने धावा करू शकता. खेळपट्टीमुळे मला खूप आश्चर्य वाटले, पण आम्ही मॅच बाय मॅच अशी खेळपट्टी बनवू शकतो का ते पाहावे लागेल.”

“आम्हाला वेगवान गोलंदाजीत थोडी सुधारणा करण्याची गरज आहे. परिस्थितीनुसार गोलंदाजी करण्याची गरज आहे. महत्त्वाचे म्हणजे विरोधी गोलंदाज काय करत आहेत यावर लक्ष ठेवणे. दुसरी गोष्ट म्हणजे गोलंदाजांनी नो-बॉल किंवा एक्स्ट्रा वाइड्स देऊ नयेत. जर पुढील सामन्यात पुन्हा असे दृश्य दिसले तर त्यांना नव्या कर्णधाराखाली खेळावे लागेल. ही माझी दुसरी चेतावणी असेल आणि मग मी माझ्या जबाबदारीवरुन पायउतार करेन.” अशी चेतावणी धोनीने संघातील गोलंदाजांना दिली आहे.