गेल्या २० वर्षात एकदाही सुट्टी घेतली नाही… पंकजा मुंडे राजकारणातून घेणार ब्रेक

Pankaja Munde Press Conference: अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत बंडखोरी करत भाजप-शिवसेनेशी हात मिळवत उपमुख्यमंत्रीपद भूषवले. अजित पवारांच्या या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला. यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) नाराज असून त्या काँग्रेसमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अशातच आता भाजपच्या राष्ट्रीय सचिव व माजी मंत्री पंकजा मुंडे आज दुपारी साडेबारा वाजता मुंबईतील वरळी येथील कार्यालयात पत्रकार परिषद घेतली.

यावेळी पंकजा मुंडे यांनी काँग्रेस प्रवेशाचं वृत्त पूर्णपणे खोडून काढलं. सध्याच्या राजकारणातले प्रयोग कोविडसारखे नवीन आहेत. बाळासाहेबांची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस राहिली नाही असं बोललं जातं. पंडित दीनदयाळ उपाध्याय आणि अटलबिहारी वाजपेयींचा भाजप राहिला नाही असं कुणी म्हणू नये असं मला वाटतं. भाजप फुटेल असा दिवस येऊ नये, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

तसेच पत्रकार परिषदेत पंकजा मुंडे यांनी मोठा गौप्यस्फोटही केला. गेल्या २० वर्षांत मी एकदाही सुट्टी घेतलेली नाही. आता मला थोडा ब्रेक घ्यावा लागणार आहे. मी ऑफिशियल सुट्टी घेणार आहे. अंतर्मुख होऊन विचार करणार आहे, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.