भाजपाच्या बी टीम कोण, सी टीम कोण हे अख्ख्या देशाने पाहिलंय – भास्कर जाधव

मुंबई – राज्यसभेच्या राज्यातल्या 6 जागांसाठी आज मतदान पार पडले आहे. शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवार (Sanjay Raut and Sanjay Pawar), राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसकडून इमाम प्रतापगढी (Praful Patel from NCP and Imam Pratapgadhi from Congress) तर भारतीय जनता पार्टीने (BJP) पीयूष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक (Piyush Goyal, Anil Bonde and Dhananjay Mahadik) यांना उमेदवारी दिली आहे.

या निवडणुकीत उमेदवाराला पहिल्या पसंतीच्या 41 मतांची गरज आहे. संख्याबळानुसार शिवसेनेचे 55 आमदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे 53 आमदार आणि काँग्रेसचे 44 आमदार आहेत. तर विरोधी पक्ष भाजपाकडे 106 आमदार आहेत. त्यानुसार भाजपाचे दोन आणि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येऊ शकतो.

भाजपाला तिसऱ्या आणि शिवसेनेला दुसऱ्या जागेसाठी अपक्ष तसंच अन्य पक्षांच्या आमदारांच्या मतांची गरज आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि समाजवादी पक्षानं महाविकास आघाडीला (MVA) पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या एकाही आमदारांचं मत कमी पडू नये यासाठी राजकीय पक्ष सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. यातच आता एमआयएमने (MIM) महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान करणार असल्याचं जाहीर केल्याने महाविकास आघाडीचा जीव भांड्यात पडला आहे. या मतांमुळे आमचा विजय निश्चित झाला असल्याचे महाविकास आघाडीचे नेते सांगत आहेत.

दरम्यान, राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एआयएमआयएमने (AIMIM) महाविकासआघाडीला मतदान करणार असल्याचं जाहीर केलं. यानंतर भाजपाने एमआयएम मविआची बी टीम असल्याचा आरोप केला. यावर शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी प्रत्युत्तर दिलंय. भास्कर जाधव म्हणाले, भाजपाच्या बी टीम कोण, सी टीम कोण हे अख्ख्या देशाने पाहिलंय. त्यामुळे भाजपा कोणाबद्दल काहीही बोलली तरी त्यांच्या शब्दाबद्दल विश्वासार्हता राहिलेली नाही. त्यामुळे भाजपा काय बोलतंय याकडे लक्ष देण्याची गरज नाही. असं ते म्हणाले.