Satyashodhak : मंत्री छगन भुजबळ यांच्या मागणीला यश; ‘सत्यशोधक’ चित्रपट झाला करमुक्त 

The movie ‘Satya Shodhak’ became tax free :- राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या मागणीला यश मिळाले आहे. देशात स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवणारे, बहुजनांसाठी शिक्षणाची दारे खुले करणारे, सत्यशोधक विचारांचे महामानव क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत ‘सत्यशोधक’ चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. आज राज्यमंत्री मंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहे.

राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सत्यशोधक चित्रपटाला करसवलत देण्यात यावी यासाठी शासनाकडे मागणी केली होती. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक भूमिका घेत यासंदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्याच्या सूचना केलेल्या होत्या. त्यानुसार आज मंत्रालयात झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत हा निर्णय होऊन सत्यशोधक चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे.

चित्रपटांवर आकारण्यात येणाऱ्या १८ टक्के जीएसटीपैकी प्रत्येकी ९ टक्के रक्कम केंद्र आणि राज्य शासनाला मिळत असते. राज्याच्या वाट्याला येणाऱ्या रकमेची करसवलत देण्याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.  या निर्णयामुळे महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचे कार्य अलौकिक कार्य भावी पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी हा चित्रपट सहाय्यभूत ठरणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी हा चित्रपट पहावा असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.