‘राज्य सरकार जनतेच्या कोणत्याही अपेक्षा पूर्ण करू न शकल्याने जनतेची सरकारवर नाराजी आहे’

मुंबई – केंद्रीय मंत्री  स्मृती इराणी (Smriti Irani) या 16 मे रोजी पुण्यात एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमासाठी आल्या होत्या. यावेळी बालगंधर्व कलादालनात कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्या वैशाली नागवडे (Vaishali Nagvade) यांनी गोंधळ घातला होता. यावेळी त्यांना मारहाण झाली. याप्रकरणी गुन्हाही दाखल झाला आहे. या घटनेनंतर भाजपने (BJP) राष्ट्रवादीवर टीका करत इराणींवर हल्ल्याचा कट होता, असा आरोप केला.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह अनेक नेत्यांवर या घटनेचा विविध माध्यमातून निषेध केला. या घटनेमुळे भाजप व राष्ट्रवादीचे नेते आमनेसामने आले होते. त्यानंतर आज केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी घटनेचा निषेध करणारं ट्विट केलं आहे.

राणे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्यावर १६ मे रोजी पुणे येथे झालेल्या हल्ल्याचा मी निषेध करतो. स्मृती इराणी कार्यक्रमाच्या निमित्ताने पुणे येथे गेल्या असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात सगळ्याच क्षेत्रांत अपयश आल्याने तसेच सरकार जनतेच्या कोणत्याही अपेक्षा पूर्ण करू न शकल्याने जनतेची सरकारवर असलेली नाराजी स्पष्ट आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांना आलेल्या नैराश्यातून हा हल्ला झाला, हे उघड आहे, अशी टीकाही राणेंनी केली आहे.