नाटक दणकून पडणार याची खात्री झाल्याने शो रद्द करण्यात आला आहे; राष्ट्रवादीची राज ठाकरेंवर टीका

पुणे – गेले अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा अयोध्या दौरा अखेर स्थगित झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे. मात्र, पुण्यातील सभा होणार असून मनसैनिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राज यांनी ट्वीटमध्ये (Raj Thackrey Tweeted) केले आहे.

राज यांची तब्बेत ठीक नसल्याने दौरा रद्द करण्यात आल्याचं सुत्रांकडून स्पष्ट करण्यात आलंय. पुण्यातील सभेमध्ये आपण यावर सविस्तर बोलणार असल्याचं राज यांनी स्पष्ट केलं आहे. राज ठाकरे हे अचानक पुणे दौऱ्यावर मुंबईला परतल्यापासूनच त्यांच्या अयोध्या दौऱ्याबद्दल चर्चांना उधाण आलं होतं. अखेर आज या चर्चांना पूर्णविराम देत राज यांनी दौरा स्थगित झाल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केलंय.

दरम्यान, हा दौरा रद्द झाल्यानंतर आता राष्ट्रवादीचे पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी टीका केली आहे. नाटक दणकून पडणार याची खात्री झाल्याने शो रद्द करण्यात आला आहे. तरी सर्व नाट्य रसिकांनी पुढील शो ची वाट बघावी. फक्त दौरा थांबला आहे, मनोरंजन नाही. असं त्यांनी म्हटले आहे.