महाराष्ट्रातील नेत्यांचा आपल्या फायद्यासाठी भाजपा नेहमीच वापर करून घेत आली आहे – राऊत

मुंबई – गेले अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा अयोध्या दौरा अखेर स्थगित झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे. मात्र, पुण्यातील सभा होणार असून मनसैनिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राज यांनी ट्वीटमध्ये (Raj Thackrey Tweeted) केले आहे.

राज यांची तब्बेत ठीक नसल्याने दौरा रद्द करण्यात आल्याचं सुत्रांकडून स्पष्ट करण्यात आलंय. पुण्यातील सभेमध्ये आपण यावर सविस्तर बोलणार असल्याचं राज यांनी स्पष्ट केलं आहे. राज ठाकरे हे अचानक पुणे दौऱ्यावर मुंबईला परतल्यापासूनच त्यांच्या अयोध्या दौऱ्याबद्दल चर्चांना उधाण आलं होतं. अखेर आज या चर्चांना पूर्णविराम देत राज यांनी दौरा स्थगित झाल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केलंय.

या पार्श्वभूमीवर हा दौरा स्थगित झाल्यानंतर शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यावरून राज ठाकरेंना खोचक शब्दांत नाव न घेता टोला लगावला आहे. तसेच, महाराष्ट्रातील नेत्यांचा आपल्या फायद्यासाठी भाजपा (BJP) नेहमीच वापर करून घेत आली असल्याची टीका देखील संजय राऊत यांनी यावेळी केली.

काहींना तीर्थयात्रेला जायचं असतं, तेव्हा ते विचारतात काही मदत करू शकता का? शिवसेनेचं एक मदत कक्ष आहे. कुणाला दर्शनाला अडचणी येत असतील, तर आम्ही मदत करतो. तिथे आम्ही राजकारण बाजूला ठेवतो, असं देखील राऊत म्हणाले.