शिरूरमध्ये कोण निवडून येणार हे नेते नाही जनता ठरवेल – अमोल कोल्हे

पुणे – पुण्यातील आंबेगाव येथे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivaji Adhalrao Patil) यांनी आयोजित केलेले क्रिकेटचे सामने पाहण्यासाठी खासदार संजय राऊत नुकतेच आंबेगावात आले होते. यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी- शिवसेना आमने-सामने आले आहेत.

शिरूरचे (Shirur) माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील हे पुन्हा संसदेत (Parliament) दिसतील. असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे. विशेष म्हणजे सध्या शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे हे खासदार (NCP MP Amol Kolhe) आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोघंही महाविकास आघाडीचे (MVA) घटकपक्ष आहेत. असं असताना संजय राऊतांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, शिरूर मतदारसंघातून कोण खासदार निवडून येणार हे नेते नाही मतदार ठरवतील असा टोला आता खासदार अमोल कोल्हे यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. शिरूरमधून शिवसेनेचे शिवाजीराव अढळराव पाटील संसदेत जातील असं वक्चव्य संजय राऊत यांनी केलं होतं.

ते म्हणाले होते, काहीही झालं तरी शिरूर लोकसभा मतदारसंघातून पुढचे खासदार शिवाजीराव अढळराव पाटील असतील. त्यांच्यामागे शिवसेना आणि उद्धव ठाकरे आहेत. यावर अमोल कोल्हे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. कोण निवडून येणार हे नेता नाही मायबाप जनता ठरवेल. शिवाजी आढळराव पाटील माजी खासदार म्हणून अन्य मतदारसंघातून निवडून येऊ शकतात किंवा राज्यसभेचे खासदरही म्हणून संसदेत येऊ शकतात. कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी अशी वक्तव्य करावी लागतात. असं अमोल कोल्हे म्हणाले.