गुणरत्न सदावर्ते यांची तिरकी चाल; आता करणार थेट राजकारणात प्रवेश ?

मुंबई – एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे गेले काही दिवस चांगलेच चर्चेत असलेले वकील गुणरत्न सदावर्ते(Advocate Gunaratna Sadavarte)  आता राजकारणात प्रवेश करण्याची शक्यता आहे. ते एसटी बँकेची निवडणूक(Election of ST Bank)  लढण्याच्या तयारीत आहेत. सदावर्तेंनी याबद्दल बोलताना म्हटलं, यापुढे कष्टकरी स्वत: त्यांच्यासाठी माणसं निवडतील. आतापर्यंत राजकीय बॉस कष्टकऱ्यांना 15 टक्के व्याज लागू करत होते. इतर राज्यांना मात्र 7 टक्के व्याज आहे. मग आम्हाला जास्त का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध नेते शरद पवार (Veteran NCP leader Sharad Pawar) यांचं राजकीय स्थान असेल. पण आम्ही तरूण भारत आहोत. आमची लढाई महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आहे. शरद पवार यांनी यादी जाहीर करावी की, सहकाराच्या माध्यमातून किती जणांना फायदा झाला.आम्ही भ्रष्टाचारासाठी तुरुंगात गेलो नव्हतो. आम्ही क्रांतिकारी आहोत. त्यामुळे भीती त्यांना असली पाहिजे आम्हाला नाही. असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.

एसटीचे  राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यासाठी जवळपास पाच महिने आंदोलन केल्यानंतर गुणरत्न सदावर्ते एसटी बँकेच्या निवडणुकीत आपलं पॅनल उभं करणार आहेत. एसटी बँकेचे राज्यात 90 हजार मतदार आहेत. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने तसेच आगामी काळातील वाटचालीकडे सदावर्ते यांच्यावर सत्तधारी आणि विरोधकांचे लक्ष असणार आहे.