सुप्रिया सुळे दारू पिऊन रस्त्यावर पडल्याचे फोटो ढीगाने सापडतील – बंडातात्या कराडकर

सातारा – साताऱ्यामध्ये बंडातात्या कराडकर यांनी वाईन विक्रीच्या विरोधात आंदोलन केलं होतं. या आंदोलनादरम्यान त्यांनी सुप्रिया सुळे तसेच पंकजा मुंडे या दारू पितात असा थेट आरोप केला आहे. सुप्रिया सुळे राजकारणात येण्यापूर्वी त्यांचे दारू पिऊन रस्त्यावर पडलेले फोटो तुम्हांला ढीगाने सापडतील असा दावा बंडातात्या कराडकर यांनी केला आहे.

साताऱ्यात बंडातात्या कराडकर यांच्या व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने दंडवत दंडुका आंदोलन करण्यात आलं. यावेळी बोलत असताना बंडातात्या कराडकर यांनी नेत्यांची मुलं रस्त्यावर दारू पिऊन पडत असल्याचे पुरावे आहेत असं म्हटलं आहे.

सुप्रिया सुळे या दारू पितात हे  वेळ आली तर सिद्ध सुद्धा करून दाखवू.  त्यांनी आमचं हे आव्हान स्वीकारावे. बंडातात्या खोटं बोलत आहेत असं सुप्रियाताईंनी म्हणावं. सुप्रिया सुळे राजकारणात येण्यापूर्वी त्यांचे दारू पिऊन रस्त्यावर पडलेले फोटो तुम्हांला ढीगाने सापडतील असा दावा देखील त्यांनी केला आहे.

एवढंच नाही तर कराडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवारांची जोडी म्हणजे ढवळ्याशेजारी पोवळा बांधला वाण नाही पण गुण लागला अशी आहे असं म्हणत सरकारवरही टीका केली आहे. दारू विक्रीचा निर्णय अजितदादांचा, मंदिरं खुली करायची नाही, ज्ञानोबारायांचा सोहळा काढायचा नाही हा निर्णय अजितदादांचा आहे. मी हे जाहीरपणे सांगतो, मनमानी आणि दादागिरी अजितदादा करतात असं देखील ते म्हणाले. दरम्यान, आता  या आरोपामुळे वाईनच्या विरोधाबरोबर आता बंडातात्या कराडकर हे महाविकास आघाडीच्या रडारवर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.