सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे या दारू पितात; बंडातात्या कराडकर यांच्या वक्तव्यामुळे खळबळ

सातारा – साताऱ्यामध्ये बंडातात्या कराडकर यांनी वाईन विक्रीच्या विरोधात आंदोलन केलं होतं. या आंदोलनादरम्यान त्यांनी सुप्रिया सुळे तसेच पंकजा मुंडे या दारू पितात असा थेट आरोप केला आहे. सुप्रिया सुळे राजकारणात येण्यापूर्वी त्यांचे दारू पिऊन रस्त्यावर पडलेले फोटो तुम्हांला ढीगाने सापडतील असा दावा बंडातात्या कराडकर यांनी केला आहे.

साताऱ्यात बंडातात्या कराडकर यांच्या व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने दंडवत दंडुका आंदोलन करण्यात आलं. यावेळी बोलत असताना बंडातात्या कराडकर यांनी नेत्यांची मुलं रस्त्यावर दारू पिऊन पडत असल्याचे पुरावे आहेत असं म्हटलं आहे.

एवढंच नाही तर कराडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवारांची जोडी म्हणजे “ढवळ्याशेजारी पोवळा बांधला, वाण नाही पण गुण लागला” अशी आहे, असं म्हणत सरकारवरही टीका केली आहे. या आरोपामुळे वाईनच्या विरोधाबरोबर आता बंडातात्या कराडकर हे महाविकास आघाडीच्या रडारवर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.